"हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच..."; 'विश्वविजेत्या' दिव्या देशमुखसाठी शरद पवारांची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 20:35 IST2025-07-28T20:34:47+5:302025-07-28T20:35:27+5:30
Sharad Pawar, Divya Deshmukh: मराठमोळी दिव्या देशमुख बनली भारताची पहिली महिला बुद्धिबळ 'वर्ल्ड चॅम्पियन'

"हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच..."; 'विश्वविजेत्या' दिव्या देशमुखसाठी शरद पवारांची खास पोस्ट
Sharad Pawar on Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर आज महाराष्ट्राच्या लेकीने नवा अध्याय लिहिला. नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे (Women's Chess World Cup Final) विजेतेपद जिंकले. ३८ वर्षांच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत करत दिव्याने हा बहुमान मिळवला. महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारी दिव्या देशमुख पहिलीवहिली भारतीय ठरली. दोन्ही खेळाडूंमधील सुरूवातीचे सामने अनिर्णित राहिले होते. त्यानंतर आज, सोमवारी रॅपिड राऊंड्समध्ये दिव्या देशमुखने विजेतेपद (Chess World Champion) पटकावले. बुद्धिबळाच्या पटावरील उदयोन्मुख खेळाडू असलेल्या दिव्याचे राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्व असलेल्या शरद पवार यांनी कौतुक केले.
शरद पवार काय म्हणाले?
"जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल! सामन्या अंती विजेत्या बुद्धिबळपटू FIDE Women's World Cup जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख ह्यांनी पटकाविला त्याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, टीमचं मनापासून अभिनंदन. तसंच गेली अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी ह्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या. जय हिंद !" अशा शब्दांत शरद पवार यांनी दिव्याचे कौतुक केले.
जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना… pic.twitter.com/X1ztVo5uQN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 28, 2025
सुप्रिया सुळेंनीही केलं अभिनंदन
"जॉर्जिया येथे पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख हिने विजेतेपद पटकावले. भारताचीच कोनेरु हंपी उपविजेती ठरली आहे. दिव्या १९ वर्षांची असून ती नागपूरची रहिवासी आहे. दिव्याचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा," असे ट्विट त्यांनी केले.