शरद पवार कसे आहेत, याचा विचार २०१९ ला आघाडी करतानाच करायला हवा होता; उद्धव ठाकरेंना घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:55 IST2025-02-13T14:07:34+5:302025-02-13T14:55:44+5:30
मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावरून ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांच आरोप प्रत्यारोप होत आहेत.

शरद पवार कसे आहेत, याचा विचार २०१९ ला आघाडी करतानाच करायला हवा होता; उद्धव ठाकरेंना घरचा अहेर
मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावरून ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांच आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या माजी आमदाराने शरद पवार कसे होते, हे आधीच माहिती होते. महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच २०१९ मध्ये याचा विचार करायला हवा होता, असा घरचा आहेर ठाकरे गटाला दिला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे व्यक्ती आहेत. ते ५०-६० वर्ष राजकारणामध्ये आहेत. २०१९ मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली त्यापूर्वी देखील शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले होते. त्यांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती होती. त्यामुळे २०१९ मध्ये युती करताना विचार केला पाहिजे होता, असे वक्तव्य वैभव नाईक यांनी केले आहे.
महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शरद पवार जर सत्कार स्वीकारत असतील किंवा सत्कार करत असतील तर आता बोलून काय उपयोग नाही. २०१९ मध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता, मग निर्णय घेतला पाहिजे होता. यावर २०२५ साली बोलून काही फायदा नाही. आता शिवसेना वाढीकडे लक्ष दिले पाहिजे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
कुडाळ नगरसेवक फुटले...
कुडाळमधील सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवक निवडून देण्याचे काम जनतेला केले होते. परंतु, सत्ताधारी पक्षाकडून लाखो रुपयांची आमिषे दाखवण्यात आली आणि ती पूर्ण केली. पालकमंत्री, शिंदे गटाचे सत्ताधारी यांनी जो शिवसेना सोडेल त्यालाच निधी मिळेल असे सांगितले होते. निधी देऊन तुम्ही लोकप्रतिनिधींना फोडू शकाल पण सर्वसामान्य लोकांना, सामान्य शिवसैनिकांना तुम्ही फोडू शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुराव्यानिशी दाखवून देऊ, त्यांचे रेकॉर्डिंग सगळे आमच्याकडे आहे. कोणी पैसे दिले? किती पैसे दिले? ते आम्ही दाखवून देऊ आणि पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचे काम आम्ही करू, असे नाईक म्हणाले.