दुष्काळाला शरद पवारच जबाबदार!

By Admin | Updated: September 8, 2015 01:35 IST2015-09-08T01:35:36+5:302015-09-08T01:35:36+5:30

राज्यात निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष व सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच जबाबदार आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील

Sharad Pawar responsible for the drought! | दुष्काळाला शरद पवारच जबाबदार!

दुष्काळाला शरद पवारच जबाबदार!

अहमदनगर : राज्यात निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष व सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच जबाबदार आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केली आहे. पाणीप्रश्नावरून भांडणे लावण्याचे काम तेच करतात. दुष्काळाच्या मुद्द्यावरून वर मोर्चा काढणाऱ्या पवारांनी एवढी वर्षे सत्तेत राहून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी लोणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना विखे यांनी पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आणि नंतर थेट त्यांच्यावर संधान साधले. विखे-पाटील म्हणाले, बारामतीकरांमुळे राज्यातील पाणी, वीज प्रश्नासोबत ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात काही वर्षे कृषिमंत्री होते. राज्यात पाटबंधारे, वीज अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. मात्र आज त्यांच्यावरच दुष्काळप्रश्नी मोर्चा काढण्याची वेळ का यावी, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. पवार ऊठसूट दुसऱ्यांवर शेतीतील काय कळते म्हणून टीका करतात. त्यांना कळत होते तर त्यांनी आजवर काय केले, असा सवाल विखे- पाटील यांनी केला.
मराठवाड्याचा दुष्काळ कायम राहावा, म्हणून पवार यांनी खुबीने नियोजन केले. नाशिक, नगर, मराठवाड्यात भांडणे लावण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यांचे साधे सर्वेक्षणही त्यांनी करू दिले नाही. गोदावरी खोऱ्याचा पाणीप्रश्न पेटत ठेवला. मात्र बीड, उस्मानाबाद, लातूरचे हक्काचे २१ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यातून देणे बंधनकारक असताना या प्रश्नाला ते बगल देतात. आज राज्यातील ८० टक्के दुष्काळ एकट्या मराठवाड्यात आहे, असे विखे म्हणाले.
शेतीचे पाणी उद्योगांकडे वळवून शेती ओस पाडण्यास पवारच जबाबदार आहेत. उद्योगांपेक्षा शेतीतून कमी कर मिळतो, असे लंगडे समर्थन केले जाते. न्याय त्यांच्या कोषातच नाही. न्याय दिल्याचे ते फक्त भासवतात. पवार शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. मात्र त्यांना ही तथाकथित टगेगिरी अपेक्षित होती, असा त्यांचा समज आहे का? हीच का बारामतीकरांची संस्कृती, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

- उसाला पाणी कमी पडते, ती तूट भरून काढण्यासाठी १२ हजार कोटींचा भीमा स्थिरीकरण प्रकल्प त्यांनी हाती घेतला. हेच पैसे वापरून पश्चिमेचे पाणी मराठवाड्याला देण्यास ते हातभार लावू शकले असते. आता मात्र त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ आठवला. त्यामुळे बारामतीकर हे खरे बहुरूपी असल्याचे सिद्ध होते, असे विखे म्हणाले.

Web Title: Sharad Pawar responsible for the drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.