Sharad Pawar reaction on India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मागील तीन-चार दिवसांपासून विकोपाला गेला होता. दोन्ही देशातील लष्करी संघर्ष थांबावा आणि तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यासाठी तयार दर्शवली आहे. दोन्ही देशात युद्धविराम झाल्याची घोषणा 'मध्यस्थ' या नात्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मागील दोन दिवसांपासून चिघळला होता. पाकिस्तानकडून रात्रीच्या वेळी भारतातील लष्करी आणि नागरी ठिकाणांवर हल्ले करण्यात येत होते आणि भारताकडून प्रत्युत्तर दिले जात होते. अखेर शनिवारी अमेरिकेच्या मध्यस्थीने हा संघर्ष थांबल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ व अनुभवी नेते शरद पवार यांनी ट्विट करत मत मांडले.
"भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं. जय हिंद!" असे ट्विट करत शरद पवार यांनी या निर्णयाला समर्थन दिले.
दुपारी ३.३५ वाजता फोन आला अन् सूत्र फिरली...
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत अधिक माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, आज दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला. यावेळी झालेल्या चर्चेत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देश जमीन आकाश आणि पाण्यामधून होत असलेले हल्ले तत्काळ प्रभावाने थांबवण्यावर सहमत झाले आहेत. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. आता दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी पुढील चर्चा करतील, असेही विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.