शरद पवारांनी अर्ध्या तासात उभारला साडेसहा कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:37 IST2018-04-23T01:37:41+5:302018-04-23T01:37:41+5:30
ग्रामस्थांशी चर्चा करताना निधी कमी पडत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले होते.

शरद पवारांनी अर्ध्या तासात उभारला साडेसहा कोटींचा निधी
दहिवडी (जि. सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांच्या दौऱ्यात राजकीय सहकारी अन् तीन कंपन्यांना फोन करुन जलसंधारणाच्या कामांसाठी केवळ अर्ध्या तासात तब्बल साडेसहा कोटींचा निधी जमविला.
त्यांच्यासोबत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार प्रभाकर घार्गे होते. त्यांनी नरवणे, वाघमोडेवाडी, मांडवे गावांना भेटी देऊन जलसंधारण कामांची पाहणी केली.
ग्रामस्थांशी चर्चा करताना निधी कमी पडत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले होते. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फोन करून बँकेतर्फे कामासाठी मदत करण्याविषयी पवारांनी सांगितले. शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्काळ एक कोटींची मदत करण्याची ग्वाही दिली. नंतर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही पवार यांच्या सूचनेवरून दीड कोटींचा निधी देण्याचे मान्य केले.
मुंबई व पुण्यातील उद्योग जगतातील काहींना मदत करण्याची पवार यांनी विनंती केली. त्यांनीही तत्काळ दोन कोटींची मदत करण्याचे मान्य केले. अर्ध्या तासाचा प्रवास संपेपर्यंत पवार यांनी तब्बल साडेसहा कोटींचा निधी जमविला. त्यानंतर लोधवडे येथे प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी गेल्यावर हा निधी देण्याचे जाहीर केले.
दुष्काळी जनतेला दिलासा
श्रमदानातून राज्यात आदर्शवत ठरेल, असे जलसंधारणाचे काम करून दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच. जमा निधी तत्काळ गावागावात पोहोचवावा. त्या निधीतून डिझेल व यांत्रिकीकरणाचे काम करावे. आणखी जेवढी मदत देता येईल ती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत पवारांनी माण, खटावच्या जनतेला दिलासा दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक : १ कोटी
सातारा जिल्हा परिषद : दीड कोटी
सातारा जिल्हा नियोजन समिती : १ कोटी
शरद पवार यांच्या खासदार निधीतून : ५० लाख
वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून : ५० लाख
मुंबई, पुणे येथील काही उद्योजक : २ कोटी