Sharad Pawar on Amit Shah: शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. आता अमित शाह यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.
"यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य होतं की त्यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हतं. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. त्यामुळे गृह खातं आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रशासकांची आज मला आठवण होत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीफार माहिती घेऊन भाषण केली तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं.
"१९७८ सालापासून माझी आठवण त्यांना झाली. चाळीस वर्षांपूर्वी राजकारणात ते नक्की कुठे होते हे मला माहिती नाही. पण १९७८ साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी जनसंघाचे अनेक कर्तृत्ववान लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक, जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. पुलोद सरकारची माहिती घेतली तर यातील सगळ्यांनी राज्यासाठी चांगलं योगदान दिलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील गृहमंत्री उपमुख्यमंत्री होते आणि आडवाणी नगरविकास खात्याचे होते. जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केलं. या सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी चांगल्या प्रकारचे योगदान दिले. ज्यांची पार्श्वभूमी जनसंघाची आहे त्या सर्वांनी माझ्यासोबत काम केलं आहे.१९७८ नंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये सुसंवाद होता," असंही शरद पवार म्हणाले.
"भूजला भूकंप झाला तेव्हा पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. तेव्हा वाजपेयी यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं. मी आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केलं त्यावर न बोललं बरं. मराठीत एक म्हण आहे कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी," असाही टोला शरद पवार यांनी लगावला.