मुंबई - धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्यात शरद पवार अजिबात तयार नव्हते. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही फोन केला होता. मात्र काही पक्षांतर्गत शक्ती धनंजयला पक्षात प्रवेश द्यावा यासाठी प्रयत्न करत होते असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, धनंजय मुंडे यांना पक्षात घ्यायलाच शरद पवार तयार नव्हते. त्याला कशाकशातून वाचवलंय त्याचा विचार करावा असं एकदा मुलाखतीत शरद पवारच बोलले होते. शरद पवारांवर टीका करण्याची हिंमत तुम्ही दाखवली. शरद पवारांची अजिबात धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्याची इच्छा नव्हती. शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला, घर फुटतंय गोपीनाथ राव सांभाळा. ४-५ वेळा धनंजय मुंडे शरद पवारांना भेटले. उद्या करू उद्या करू असं सांगितले. त्याशिवाय पक्षातील काही शक्ती त्यांना प्रवेश द्यावा यासाठीही प्रयत्नशील होत्या. मी त्यांचे नाव घेणार नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच पहाटेच्या शपथविधीबाबत धनंजय मुडे यांचे विधान ढोंग आहे. त्यांच्या घरातून गाड्या बाहेर पडल्या, त्यांच्या घरातून सगळ्यांना फोन गेले. साडे तीन वाजेपर्यंत ते कुठे होते. साडे तीन वाजता ते शरद पवारांना भेटायला वाय.बी चव्हाणला आले. षडयंत्र होतं मग जे षडयंत्र यांना समजलं ते अजितदादांना समजलं नाही, अजितदादा लहान होते का? तेदेखील गद्दारीच्या षडयंत्रात सहभागी होते. हिंमत असेल तर कुणी तुम्हाला जाळ्यात अडकवले, कुणी फसवलं हे समोर येऊन सांगावे असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंना केलं.
दरम्यान, वाल्मिक कराड गुन्हेगार आहे हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे हे त्यांनीच सांगितले. कराडला अटक केली तेव्हाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. हत्या ही सर्वात घाणेरडे काम आहे. कर्माची फळे मिळालीच पाहिजेत. कायद्याचा, अधिकाराचा, सत्तेचा गैरवापर करणे, बीडमध्ये गुन्हेगारी होते ती कोण करते, सामान्य माणसे करत नाहीत. राजकारणात एखाद्या माणसाचा वापर करून गुन्हेगार बनवणे फार सोपे असतात. गोपीनाथ मुंडे असेपर्यंत धनंजय मुंडे यांना एका मर्यादेपर्यंत ठेवले होते. गरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुटले जातात. एवढा मोठा गुन्हा असून सरकारने नोंदवला नाही. एका माणसासाठी सरकारने किती सहन करायचे. परंतु यामुळे सरकार बदनाम होते ना असा टोलाही आव्हाडांनी लगावला.