Sharad Pawar Reaction On Thackeray Brothers Yuti: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक कंबर कसून तयारीला लागले आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबतच्या हालचालींनी वेग घेतल्याचे मानले जात आहे. याबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले असून, भाजपानेही विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई मनपा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.
शरद पवार पत्रकारांना संबोधित करत होते. यात ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का, अशा आशयाचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही.
एक वेगळे समीकरण बघायला मिळेल
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल. आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि उबाठा गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दोघे भाऊ एकत्र येऊन आपल्या पक्षांची ताकद दाखवतील. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळे समीकरण बघायला मिळेल, असे शरद पवार यांनी पुढे बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, आम्ही बसून निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असे नाही. नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचे बलस्थान कुठे आहे, त्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल. जसे आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला आम्ही एकत्र सामोरे गेलो, तसे इथे काही ठिकाणी जाऊ, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच याबाबत भाष्य केले होते. शरद पवार यांचा विषय तसा अडचणीचा नाही. त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत. विषय फक्त मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतंत्र निवडणुका लढलेल्या आहेत. त्यांनी कुणाबरोबर युती केली असे मला दिसलेले नाही. त्यांची प्रथमच शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.