शरद पवार हिंदूविरोधी; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढलं पत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 22:23 IST2020-02-04T22:23:06+5:302020-02-04T22:23:37+5:30
शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केला आहे.

शरद पवार हिंदूविरोधी; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढलं पत्रक
मुंबई- शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केला आहे. शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं प्रसिद्धीला दिलं आहे. शरद पवार हिंदूविरोधी असल्याचा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं गंभीर आरोप केलेला आहे, शरद पवारांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असं राष्ट्रीय वारकरी परिषदेनं पत्रकात म्हटलं आहे. पवार हिंदूविरोधी असल्याचा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे.
सर्व संप्रदायाची वारकरी मंडळी पंढरपुरात आलेली असता त्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे. त्याचदरम्यान वक्ते महाराजांनी एक पत्रक काढलं असून पवारांना कोणत्याही वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला बोलावू नये, असं नमूद करण्यात आला आहे. शरद पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिकवादी मंडळींना पाठिंबा देण्याचं काम करतात. त्यामुळे शरद पवारांना यापुढे कुठल्याही कार्यक्रमाला वारकऱ्यांनी बोलावू नये, अशा आशयाचं हे पत्रक वक्ते महाराजांनी काढलं आहे.
2018साली महाराष्ट्र सरकारचा ग्यानबा तुकाराम पुरस्कार या वक्ते महाराजांना देण्यात आला होता. वक्ते महाराज हे हिंदुत्ववादी संघटनांच्या जवळचे समजले जातात. मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई हा वारकऱ्यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे याचा दूरगामी परिणाम होणार आहे. विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसला जोडून वक्ते महाराजांचं काम होत असल्याचंही सांगितलं जात आहे.