शक्ती मिल बलात्कार प्रकरण, दोघे अल्पवयीन आरोपी दोषी
By Admin | Updated: July 15, 2014 15:40 IST2014-07-15T15:32:33+5:302014-07-15T15:40:45+5:30
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघा अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवत त्यांना ३ वर्षांसाठी नाशिकमधील शाळेत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

शक्ती मिल बलात्कार प्रकरण, दोघे अल्पवयीन आरोपी दोषी
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १५ - मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघा अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवले. या दोघांच्याही वर्तनात सुधार व्हावा म्हणून त्यांना नाशिकमधील बोस्टन शाळेत पाठवण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे गेल्या वर्षी २२ ऑगस्ट रोजी एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच नराधमांना अटक केली होती. यानंतर एका टेलिफोन ऑपरेटर तरुणीनेही सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. छायाचित्रकार तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या दोन्ही प्रकरणांमध्ये विजय जाधव ( वय १९), मोहम्मद कासीम शेख ऊर्फ कासीम बंगाली (वय २१) आणि सलीम अन्सारी (वय २८), सिराज खान (वय ३२) आशफाक शेख (वय २६) या नराधमांसह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यातील पाच आरोपींना मार्चमध्येच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर दोन अल्पवयीन आरोपींविरोधात बाल न्यायालयात खटला सुरु होता. बाल न्यायालयाने मंगळवारी या दोन्ही अल्पवयीन आरोपींना दोषी ठरवले. तसेच त्यांना तीन वर्षांसाठी नाशिकमधील बोस्टन शाळेत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली.