दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन करण्यात आलं. मात्र एकीकडे हा कार्यक्रम सुरू असतानाच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.
या आंदोलनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार जेएनयूमध्ये प्रभावी असलेल्या डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला आणि त्यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारच्या कारभाराविरोधात आक्रमक होत एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी जवाहरलान नेहरू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केलं.
या आंदोलनादरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात सरकारने पारित करून घेतलेले जनसुरक्षा विधेयक, हिंदी भाषेच्या सक्तीचा घेतलेला निर्णय यावरून विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोध दर्शवला. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, असं लिहिलेले फलक हातात घेतले होते. महाराष्ट्रात राजकारण्यांकडून द्वेष पसरवल्या जातोय, मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तरी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरळीत पार पडला.