सेवाग्राम राष्ट्रीय स्मारक प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यावा

By Admin | Updated: July 15, 2014 03:04 IST2014-07-15T03:04:32+5:302014-07-15T03:04:32+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेले सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विजय दर्डा १० वर्षांपासून प्रयत्न करत आहेत

Sewagram National Memorial Project Immediately complete the project | सेवाग्राम राष्ट्रीय स्मारक प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यावा

सेवाग्राम राष्ट्रीय स्मारक प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यावा

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेले सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विजय दर्डा १० वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्ह्यातील आगमनाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम आश्रमासह वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारने नागपूर ते वर्धा पर्यटन सर्किट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४९० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे स्वागतार्ह पाऊल असून, यासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच हे काम तातडीने हाती घ्यावे आणि युद्धपातळीवर ते पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षा खा. दर्डा यांनी व्यक्त केली आहे.
सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी खा. दर्डा हे १० वर्षांपासून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने मागणी करीत आहेत. दर्डा यांनी तत्कालीन केंद्रीय पर्यटन मंत्री अंबिका सोनी व चिरंजीवी यांनाही पत्र लिहिले होते. अंबिका सोनी यांनी दर्डा यांच्या प्रश्नावर राज्यसभेत उत्तर देताना हा राज्य सरकारचा विषय असून, राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवीत असल्याची माहिती दिली होती.
सेवाग्राम हे देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याची प्रेरणा या क्रांतिभूमीने दिली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, सरहद्द गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, आचार्य कृपलानी, जमनालाल बजाज आदी थोर पुरुष सातत्याने सेवाग्राममध्ये यायचे व गांधींचे मार्गदर्शन घ्यायचे. गांधीजींनीही अशी जागा निवडली होती की जी देशाच्या मध्यभागी आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमाशी असलेले ऋणानुबंध आयुष्यभर जपले. स्वर्गीय राजीव गांधी यांनीही हा वसा पुढे नेला. इंदिरा गांधी यांनी लक्ष घालून सेवाग्रामच्या विकासासाठी ९० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, स्थानिक विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अलीकडेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना खा. दर्डा यांनी राज्यसभेत अत्यंत महत्त्वपूर्ण अशा १७ सूचना केल्या. यात सेवाग्रामला राष्ट्रीय स्मारक करून त्याचा विकास व्हावा, याही सूचनेचा अंतर्भाव होता. यासंदर्भात दर्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिले.
जगातील इतर राष्ट्रांमध्ये त्या त्या देशातील राष्ट्रपुरुषांचे स्मारक असते तशा दर्जाचे स्मारक सेवाग्राम येथे व्हावे, अशी खा. दर्डा यांची इच्छा आहे. २० वर्षांपूर्वी अमेरिकन संशोधक काही कलावंतांना घेऊन सेवाग्रामला आले होते. हा वारसा आपल्या देशात जतन करण्यासाठी त्यावेळी त्यांनी प्रयत्न केले. जगप्रसिद्ध ‘गांधी’ चित्रपटाचे रिचर्ड अ‍ॅटनबरो येथे दर्शनासाठी नेहमी यायचे. पण सेवाग्रामकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. हे राष्ट्रीय स्मारक जपले पाहिजे, अशी कळकळीची विनंती खा. दर्डा यांनी सरकारकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sewagram National Memorial Project Immediately complete the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.