माळशेजमध्ये आढळले सातवाहनकालीन चौक्या
By Admin | Updated: January 13, 2015 04:49 IST2015-01-13T04:49:19+5:302015-01-13T04:49:19+5:30
मुरबाडमध्ये माळशेज घाटात डोंगर पायथ्याशी सातवाहनकालीन रखवालदारांच्या चौक्या सापडल्या आहेत. घाटातील छत्री पॉइंट परिसरात सातवाहनकालीन शिलालेख सापडण्याची शक्यता इतिहास संशोधक व्यक्त करत आहेत.

माळशेजमध्ये आढळले सातवाहनकालीन चौक्या
राजेश भांगे, शिरोशी
मुरबाडमध्ये माळशेज घाटात डोंगर पायथ्याशी सातवाहनकालीन रखवालदारांच्या चौक्या सापडल्या आहेत. घाटातील छत्री पॉइंट परिसरात सातवाहनकालीन शिलालेख सापडण्याची शक्यता इतिहास संशोधक व्यक्त करत आहेत. त्यामुळे माळशेज घाट ऐतिहासिक पर्यटनस्थळ बनण्याची चिन्हे आहेत.
छत्री पॉइंटच्या पुढे एका वळणावर पायवाट असून तिच्या बाजूला दोन चौक्या आहेत. त्यांची उंची पाच फूट; तर लांबी आठ फूट आहे. तालुक्यातील काही इतिहास संशोधक मंडळांचे सदस्य अविनाश हरड, योगेंद्र बांगर, हरेंद्र सोष्टे, प्रणिती हरड यांनी या चौक्यांवर प्रकाश टाकला आहे. या दोन्ही चौक्या माळशेज महामार्गावरून स्पष्टपणे दिसतात. चौक्यांच्या बाजूला दोन मोठी तळी आहेत. तळ्यांमध्ये हिरवेगार पाणी आहे. पूर्वीच्या काळात देशविदेशांतून कल्याण बंदरामध्ये माल आल्यानंतर तो माळशेज घाट व नाणेघाटात आणला जायचा़ त्यासोबत असणाऱ्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी रखवालदारांच्या या चौक्या बनवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चौक्या उंचावर असल्याने दरीच्या बाजूला असणारी लहान गावे सावर्णे व थीधबी ही स्पष्टपणे दिसतात. या गावांवर नीट लक्ष देता यावे, यासाठी चौक्या उंचावर असाव्यात, असा अंदाज आहे.