सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारावा

By Admin | Updated: February 19, 2015 01:17 IST2015-02-19T01:17:28+5:302015-02-19T01:17:28+5:30

राजदंड हातात घेतलेला पुतळा उभारावा, अशी अपेक्षा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

Set up a throne statue | सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारावा

सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारावा

पुणे : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारताना शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याऐवजी सिंहासनाधिष्ठित किंवा राजदंड हातात घेतलेला पुतळा उभारावा, अशी अपेक्षा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. यावर कृतिशील पाऊल म्हणून त्यासाठीचे मॉडेलही तयार केले असून, ते लवकरच राज्य शासनाला सादर केले जाणार आहे.
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारताना अश्वारूढ पुतळ्याबाबत अनेक आक्षेप घेतले जात आहेत. तब्बल १९० मीटर उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारताना त्याचा चौथरा उभारण्यापासून अनेक प्रश्न आहेत. शिवाय पुतळ्याची प्रमाणबद्धता टिकविताना अश्वाची उंची साहजिकच जास्त होणार असल्याने शिवराय झाकले जाण्याचीही भीती आहे. यावर उपाय म्हणून सिंहासनाधिष्ठ शिवराय किंवा स्वराज्याचा राजदंड हातात घेऊन उभे असलेले शिवराय असा पुतळा उभारणे योग्य राहील. यामुळे सर्व दिशांनी शिवरायच दिसतील, असा उपाय गायकवाड यांनी सुचविला आहे.
गायकवाड म्हणाले, ‘‘शिवस्मारक हे जगातील अद्वितीय स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्यशासनाने आवश्यक ती मंजुरी दिल्याने आता या स्मारकाच्या निर्मितीला गती येईल. सध्याच्या आराखड्यात महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा विचार आहे. सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये अश्वारूढ पुतळे उभारण्यात आले असून, त्यामध्ये शिवाजी महाराजांपेक्षा अश्वाचेच जास्त दर्शन होते. महाराजांचे केवळ २० टक्केच दर्शन होते.
शिवराय आणि मराठी मनासाठी सर्वांत मोठा दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन. महाराजांनी राज्याभिषेकदिनी स्वराज्याची स्थापना करून ते सिंहासनाधिष्ठ झाले होते. स्वराज्यस्थापनेचे प्रतीक म्हणून असा पुतळा या स्मारकात उभारणे यथोचित होईल. यामध्ये पूर्ण लक्ष फक्त महाराजांवरच असेल. सिंहासनाच्या दोन खांबांमधून लिफ्ट ठेवून त्यातून वरती जाऊन नागरिकांना शिवरायांचे मुखदर्शन घेता येईल.
याबरोबर पुतळा उभारणीत आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे स्वराज्यनिर्मितीचे प्रतीक असलेला राजदंड उजव्या हातात घेऊन उभे असलेले महाराज हा पुतळा उभारल्यास त्यातही पूर्ण लक्ष केवळ महाराजांकडेच असेल. चारही बाजूंनी या पुतळ्याकडे पाहिल्यास महाराजांचे सुंदर रूपाचे दर्शन सर्वांना होईल. राजदंडामधून लिफ्ट ठेवून त्यातून नागरिकांना महाराजांचे मुखदर्शन होईल, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.
या स्मारकात महाराजांचे साहित्य आणि त्यांच्यावरील साहित्याची मांडणी प्रभावी पद्धतीने करता येऊ शकेल. हा पुतळा मुंबईतच उभारण्यात यावा; कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे दररोज देशभरातील आणि परदेशातील हजारो नागरिक येत असतात. त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर तेथे ते जातील आणि पर्यटन वाढेल. यामुळे स्मारकाच्या वैभवात भर पडेल.
या स्मारकाला मराठीत स्वराज्यशिल्प म्हणून आणि इंग्रजीमधून स्टॅच्यू आॅफ इन्डिपिडेन्डंट किंवा स्टॅच्यू आॅफ स्वराज नाव देण्यात यावे. महाराजांनी अनेक गड, किल्ले उभारल्याने या स्मारकात त्यांच्या प्रतिकृती उभारण्यात याव्यात आणि त्यात त्यांचा इतिहास दृकश्राव्य स्वरूपात सांगण्यात येण्याची यंत्रणा उभारावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. (प्रतिनिधी)

भारतीय आरमाराचे जनक म्हणून महाराजांकडे पाहिले जाते. त्यामुळे शिवस्मारकात समुद्राच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचा जन्मपट उलगडणारा लेझर शो असावा. त्याचबरोबर महाराजांसंदर्भातील वाङ्मयही तेथे शिल्पस्वरूपात असावे; ज्यामध्ये महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दाखवले जाऊ शकतील.
- अमित गायकवाड

Web Title: Set up a throne statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.