'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:23 IST2025-10-15T12:02:13+5:302025-10-15T12:23:55+5:30
नक्षल कॅडरचा मोठा नेता भूपती

'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
CM Devendra Fadnavis on Naxalite Bhupati Surrender: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादी नेता वेणुगोपाल भूपतीच्या आत्मसमर्पणाबाबत पोलिसांनी दिलेले वचन पूर्ण केले. भूपतीचे आत्मसमर्पण तेलंगणा पोलिसांकडे किंवा छत्तीसगड पोलिसांकडे होणे अपेक्षित होते. मात्र भूपतीने महाराष्ट्र पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. भूपतीने त्याच्या साथीदारांसह मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. यावेळी बोलताना माओवादी चळवळीविरोधातील हे मोठं यश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून माओवादाच्या विरुद्ध लढाई सुरु झाली तर गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात माओवाद मुक्त भारत करण्याची योजना सुरु झाली. त्याअंतर्गत गेली १० वर्षे आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध प्रचंड मोठा लढा उभारला. आज तो लढा समाप्तीकडे चालला आहे. आज सोनू उर्फ भूपती यांच्यासोबत ६१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. भूपती दंडकारण्यासह गडचिरोलीत दलम तयार करण्यापासून मोठी सेना तयार करणारा प्रमुख होता. त्याच्या आणि आधीच्या आत्मसर्मपणामुळे उत्तर गडचिरोलीतील माओवाद पूर्ण समाप्त केला आहे. आता फक्त कंपनी १० चे बोटावर मोजण्याइतके लोक बाकी आहेत. आम्हाला विश्वास आहे की, ते देखील आत्मसमर्पण करतील. त्यामुळे आज आपण गडचिरोलीतील माओवाद समाप्तीपर्यंत आणला आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"पोलीस दलाने गेली महिनाभर चर्चा करुन, जेरीस आणून भूपतीसारख्या एका मोठ्या लिडरला तयार केलं आणि त्याने जाहीर आवाहन करुन टाकलं की माओवाद संपलेला आहे. यातून काहीही मिळवू शकत नाही. म्हणून आत्मसमर्पण केले पाहिजे. आजच्या या घटनेमुळे छत्तीगडमध्येही आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा आहे. भूपतीची इच्छा होती की मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करु. माझ्याशी वरिष्ठांनी याबाबत चर्चा केली तेव्हा मी सांगितले की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे. पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इथे आणून सुरक्षा दलाने आत्मसमर्पण करायला लावलं. पोलिसांच्या शब्दाचा देखील विषय होता. पोलिसांनी सांगितले होते की मुख्यमंत्री स्वतः येतील. म्हणून सगळे कार्यक्रम रद्द करुन याठिकाणी आलो. कारण ही महत्त्वाची घटना आहे," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना नोकऱ्या आणि घरे दिली. आम्ही त्यांचे लग्न लावले. आज अनेक माओवादी ५०,००० रुपये पगारावर काम करत आहेत. यामुळे माओवाद्यांना विश्वास मिळाला की महाराष्ट्रात त्यांना चांगले वागवले जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.