Maharashtra Politics: निवडणूक आयोगाच्या निकालावर उज्ज्वल निकमांचे सूचक भाष्य; म्हणाले, “सुप्रीम कोर्ट स्थगिती...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 20:50 IST2023-02-18T20:50:31+5:302023-02-18T20:50:57+5:30
Maharashtra News: हा कायद्याचा मोठा गुंता निर्माण झाला आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाच्या निकालावर उज्ज्वल निकमांचे सूचक भाष्य; म्हणाले, “सुप्रीम कोर्ट स्थगिती...”
Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यावरून महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली असून, शिंदे गट आणि भाजपने या निर्णयाचे स्वागत केले आहे. यातच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केले आहे.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रेचा खटला प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना, हा कायद्याचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे युक्तिवाद करण्यात येतील. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल? हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते या प्रकरणात कायद्याचे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत, केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याला न्यायालय स्थगिती देईल का? हे बघितले पाहिजे, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली
निवडणूक आयोगाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्या आधी द्यायला नको होता. निवडणूक आयोगाकडे तेवढी परिपक्वता असायला हवी होती. याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याचे भान निवडणूक आयोगाला असायला हवे होते, असे मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी देऊन गंभीर चूक केलेली आहे, असे उल्हास बापट म्हणाले.
दरम्यान, हा अक्षरश: एक राजकीय भूकंप आहे. त्याचे किती परिणाम होतात आणि किती त्याच्यामध्ये येतात हे काळच ठरवेल. आता चार-सहा दिवसात कदाचित सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर का आताच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या उलटा लागला तर मग सगळी गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असेही बापट यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"