सेनेची नाराजी दूर, अनंत गीते स्वीकारणार पदभार
By Admin | Updated: May 28, 2014 10:44 IST2014-05-28T10:16:28+5:302014-05-28T10:44:22+5:30
शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून सेनेत सुरू झालेले नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आले असून गीते आज पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

सेनेची नाराजी दूर, अनंत गीते स्वीकारणार पदभार
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २८ - शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून सेनेत सुरू झालेले नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आली असून गीते आज सकाळी ११ वाजता पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. दरम्यान शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत सेनेचे तब्बल १८ खासदार निवडून आल्यानंतरही केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते यांच्या रूपाने शिवसेनेच्या वाट्याला एकमेव कॅबिनेट मंत्रिपद आले होते. त्यामुळे सेनेत नाराजी पसरली होती. त्याच पार्श्वभूमीवर शपथविधीनंतर मंगळवारी मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी पदभार स्वीकारला तरी गीतेंनी पदभार स्वीकारला नव्हता. तसेच खाते बदलून देण्याची मागणी सेनेने दिल्लीत भाजपाच्या नेत्यांकडे केली होती. मात्र अखेर बुधवारी सेनेने पद स्वीकारण्यास मान्यता दर्शवली आणि अनंत गीते पदाचा कार्यभार स्वीकारण्यास तयार झाले.
भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही मोदींनी इतर घटक पक्षांची आवर्जून आठवण ठेवली. मात्र तरीही सेनेने नाराजी दर्शवली. केंद्र सरकारमध्ये भाजप व सेना वगळता इतर पक्षांचे बलाबल पाहता; जे मंत्रालय मिळाले आहे, ते निमूटपणे स्वीकारण्याशिवाय शिवसेनेला गत्यंतर नसून त्याच पार्श्वभूमीवर कालपर्यंत नाराज असलेल्या गीतेंनी आज अचानक पदभार स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे स्पष्ट होत आहे.