लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुण्यातील व्यापाऱ्याला ५० लाखांच्या नोटा २५ लाखांत देण्याचे आमिष दाखवून ठगांनी दोन व्यावसायिकांना लुबाडल्याचा प्रकार बुधवारी चेंबूरमध्ये घडला. याप्रकरणी तोतया पोलिसांसह नऊजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेहरूनगर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
तक्रारदार संतोष खांबे (वय ४३, रा. पुणे) यांचा पुण्यात अमित कारंडे यांच्यासोबत भागीदारीत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. कारंडे यांना १५ एप्रिलला त्यांच्या ओळखीतील प्रवीण मुंगसे याने २५ लाख रुपये दिल्यास बाजारात वापरता येईल, अशा ५० लाखांच्या चलनी नोटा देण्याचे आमिष दाखविले. चर्चेअंती खांबे आणि कारंडे यांनी हा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरवले. मुंगसे याने कारंडे यांना काॅल करून ३० एप्रिलला २५ लाख रुपये घेऊन चेंबूरमध्ये भेटायला बोलावले.
त्यानुसार दोघेही २५ लाख रुपये घेऊन ३० एप्रिलला दुपारी चेंबूर येथे गेले. तेथे प्रवीण मुंगसे याने दशरथ लोहोटे (५८) याची त्यांना ओळख करून दिली. कारंडे आणि खांबे यांनी आणलेल्या गाडीत बसून चौघेही जण स्वस्तिक चेंबर येथे गेले. तेथे त्याचा आणखी एक साथीदार मुकुंद झा (४०) भेटला. तेथे समोरील पार्टी पैसे घेऊन येणार आहे, असे सांगून कारंडे आणि खांबे यांना सुमारे तासभर तेथे थांबविले. सायंकाळी दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांच्याशी मुंगसे आणि लोहोटे यांनी चर्चा केली.
बनावट नोटांचे प्रकरणचौकशीत दुप्पट रक्कम लगेच मिळणार होती, अशी माहिती मिळत आहे. त्यावरून हा सौदा बनावट नोटांचा तर नव्हता ना, हेही तपासले जात असल्याचे नेहरूनगर पोलिसांनी सांगितले.
अशी झाली लूटखासगी वाहनात बसून मुंगसे व त्याच्या दोन सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना अचानक शेजारी कार थांबली. त्यातून चार ते पाच तरुण उतरले. पोलिस आहोत, असे ते ओरडून सांगत होते. त्यातल्या एकाने खांबे यांच्या हातातील २५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावली आणि ही मंडळी निघूनही गेली. कारंडे, खांबे यांनी तोतया त्यांच्या कारचा पाठलाग केला, पण ते सापडले नाहीत.