सचिवांनी केले कामकाज तहकूब!
By Admin | Updated: July 22, 2015 01:12 IST2015-07-22T01:12:35+5:302015-07-22T01:12:35+5:30
विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सचिवांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केल्याची अभूतपूर्व घटना घडली. सचिवांचे हे कृत्य घटनाबाह्य

सचिवांनी केले कामकाज तहकूब!
मुंबई : विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सचिवांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केल्याची अभूतपूर्व घटना घडली. सचिवांचे हे कृत्य घटनाबाह्य असल्याचे मत शेकापच्या जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
नेहमीप्रमाणे विधान परिषदेचे कामकाज सकाळी १० वाजता सुरू होणार होते. त्यासाठी रिवाजानुसार ९.५५ वाजता कोरमची बेल वाजू लागली. मात्र १० वाजले, तरी बेल थांबली नाही की कामकाजही सुरू झाले नाही. १०.१० मिनिटांपर्यंत बेल वाजतच राहिली. पण सभागृहात सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे यांच्यापैकी कुणीही हजर नसल्याने विधान परिषद सचिवांनी सव्वा दहा वाजता सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांकरिता तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.
साडे दहा वाजता कामकाज सुरू झाले तेंव्हा तालिका सभापती रामनाथ मोते हे उपस्थित होते. मोते यांनी पाऊस आणि ट्रॅफीकमुळे उशीर झाल्याचे सांगत सभागृहाची माफी मागितली. शेकापचे जयंत पाटील यांनी मात्र या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला. आता, सभागृहाचे कामकाज सचिव चालविणार का, असा सवाल करतानाच सचिवांना तसा अधिकार नसल्याचे पाटील म्हणाले. ठरलेल्या वेळी सभापती, उपसभापती अथवा चार तालिका सभापती कोणीच उपस्थित नाही. त्यामुुळे सचिवांनी कामकाज पुढे ढकलल्याची घोषणा करणे ही सभागृहाच्या नियमांची पायमल्ली असल्याचे पाटील म्हणाले. सभागृहाचे नियम व परंपरांची जपणूक करताना अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये, असे जयंत पाटील म्हणाले.