Maharashtra Nagar Parishad Election 2025: नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 08:00 IST2025-12-20T07:59:48+5:302025-12-20T08:00:20+5:30
राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान

Maharashtra Nagar Parishad Election 2025: नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
मुंबई : राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य तसे विविध नगरपरिषदा व नगर पंचायतींमधील १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान शनिवारी होणार असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबरला २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे.
राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी २१ डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी १० वाजता सुरू होईल. सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी शक्यता आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढले.
महापालिकांसाठी आयोगाचे निर्देश
महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आणि आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी एका बैठकीत दिले.
वाघमारे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.
काकाणी यांनी बैठकीत सादरीकरण केले. महानगरपालिकेसंदर्भातील अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
महापालिकांची रंगीत तालीम
विरोधी महाविकास आघाडीतील पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला याचा फैसला या निमित्ताने होणार आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यामुळेही नगर परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करावी
१. भरारी पथकांच्या माध्यमांतून आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था करावी; तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिस यंत्रणेसोबत समन्वय साधावा.
२. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागातील जागानिहाय आरक्षण, नामनिर्देशनपत्र व शपथपत्राचे नमुने, इतर आवश्यक अधिकारी/कर्मचारी, आवश्यक साहित्य आदींची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.
३. २ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या २६३ नगरपरिषदा व नगरपंचातीचा अनुभव लक्षात घेता मतदारांना सहज व सुलभरीत्या मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर किमान सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शक्य असलेल्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे किंवा पिंक मतदान केंद्रांची उभारणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.