दुसरे मंगलाष्टक सुरू होताच व-हाडात तुंबळ हाणामारी
By Admin | Updated: May 29, 2017 20:36 IST2017-05-29T20:36:12+5:302017-05-29T20:36:23+5:30
मंगल कार्यालयात वाजत गाजत, डीजेच्या धूममध्ये वरात आली... वधू-वर बोहल्यावर चढले, आंतरपाठ धरला, वधू-वरांच्या आयुष्यातही महत्त्वाची लग्नघटिका

दुसरे मंगलाष्टक सुरू होताच व-हाडात तुंबळ हाणामारी
>ऑनलाइन लोकमत
आखाडा बाळापूर(जि.हिंगोली), दि.29 - मंगल कार्यालयात वाजत गाजत, डीजेच्या धूममध्ये वरात आली... वधू-वर बोहल्यावर चढले, आंतरपाठ धरला, वधू-वरांच्या आयुष्यातही महत्त्वाची लग्नघटिका सुरू झाली. दुसरे मंगलाष्टक सुरू झाले तोच व-हाडी मंडळीत भांडणे सुरू झाली. तुफान मारामारी सुरू झाली... ती स्टेजपर्यंत आली. नवरीला एकीकडे तर नवरदेवाला दुस-या खोलीत ढकलले. सारी पळापळी सुरू झाली. पोलिसांची योग्य वेळी एन्ट्री झाली मोठा अनर्थ टळला. पाच तासानंतर पोलिसांच्या साक्षीने वधू-वर विवाहबद्ध झाले.
चित्रपटाला लाजवेल असा हा आगळा वेगळा विवाह सोहळा बाळापुरात घडला. त्याचे झाले असे की, आखाडा बाळापूर येथील कुसूमताई चव्हाण सभागृहात २९ मे रोजी बाळापूर येथील वधू कविता बाळू धोतरे व नांदुरा (देवी) जि.हिंगोली येथील वर ब्रम्हा हरिभाऊ शिंदे यांचा शुभविवाह सकाळी ११.३५ वा. आयोजित केला होता. लग्नाची जय्यत तयारी झाली. डीजे लावून वरात निघाली. ती मंडपी पोहोचली. मंगलअष्टके सुरू झाले. पण व-हाडी मंडळीत पिण्याचे पाणी देण्यावरून वाद झाला. मारामारीत झाली. दुसरे मंगलअष्टक सुरू होताच सभागृहात धावपळ सुरू झाली. तीन-चार जणांचे डोके फुटले. या मारामारीमुळे लग्नकार्य थांबले. पोलिसांना ही बातमी कळताच सपोनि जी.एस.राहिरे, फौजदार सविता बोधनकर, जमादार संजय मारके, अशोक कांबळे, प्रशांत शिंदे सह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मारामारी थांबली पण आक्रोश थांबेना. डोके फुटलेला गृहस्थ ठाण्यात नेला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात पाठविले. त्यापाठोपाठ सारे व-हाड ठाण्यात जमले. पोलिसांनी समजूत घालत विवाह उरकण्याची विनंती केली. कारण भांडणात नवरी- नवरदेवाचा काय दोष? अशी समजूत घातली. पण हे लग्न होणे नाही, अशी भूमिका मुलाकडच्यांनी घेतली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या सोबत चर्चा झाली. तीन तास मानापमान नाट्य रंगले. अखेर नवरदेव तयार झाला. पण अर्धवट लग्नविधी मोडलेल्या त्या ठिकाणी पुन्हा लग्न करणे अपशकुन मानला जाते. त्यामुळे आम्ही तेथे विवाह करणार नाही, अशी अट घातली. प्रभारी ठाणेदार सपोनि जी.एस.राहिरे यांनी पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना ही हकीकत सांगितली व ठाणे आवारात विवाहविधी उरकण्याची परवानगी मागितली.
चावरिया यांनी परवानगी देताच ठाण्याच्या आवारातच विवाह सोहळा सुरू झाला. बीट जमादार मारके यांनीच आंतरपाठ धरला. मंगलाष्टके झाली. फुलांच्या अक्षता पडल्या. पोलिसांच्या व वºहाडाच्या साक्षीने वधू-वर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. पोलिस ठाण्यात विवाह विधी पार पाडण्यासाठी सपोनि जी.एस.राहिरे, एएसआय दीपक नागनाथ, जमादार संजय मारके, अशोक कांबळे, कळमनुरी पं.स.उपसभापती चंद्रकांत डुकरे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रामभाऊ जाधव, सचिन रावजी बोंढारे, सपोउपनि रमन रघूनाथ शिंदे, राम साखरे, महंमद गौस, अण्णा जाधव, पोकाँ प्रशांत शिंदे, जमादार गुहाडे, पाईकराव, गुरू पवार, पोलिस पाटील पंडित यांच्यासह पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.