यवतमाळपर्यंत होता समुद्र; जीवाश्म सापडले, पांढरकवडा जंगलात शंख-शंपल्यांचे खडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 05:54 IST2018-03-06T05:54:51+5:302018-03-06T05:54:51+5:30

यवतमाळपर्यंत होता समुद्र; जीवाश्म सापडले, पांढरकवडा जंगलात शंख-शंपल्यांचे खडक
- ज्ञानेश्वर मुंद
यवतमाळ : समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर दिसत आहेत. त्यामुळे चार हजार वर्षापूर्वी हा परिसर समुद्र असावा, याला पुष्टी मिळाली आहे.
नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अनेक रहस्य दडलेली असून, त्यातीलच एकाचा शोध पांढरकवडा येथील मोघे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्रा. डॉ. विजय वातिले यांनी लावला. पांढरकवडा तालुक्यातील ताडउमरी रस्त्याने जाताना कोंडी टेकडी लागते. जंगलात अर्धा किलोमीटर आत ही टेकडी असून या टेकडीवरील खडक हे जीवाश्माचे आहेत. समुद्रात आढळून येणाºया कोट्यवधी शंख आणि शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले आहे. शिंपल्यांचे खडक टेकडीवर दिसतात.
झरीजामणी तालुक्यातील माथार्जुनपर्यंत अंतराअंतरावर असे शंख-शिंपले आढळून येतात. त्यामुळे चार हजार वर्षापूर्वी हा भूभाग समुद्र असण्याची शक्यता प्रा. वातिले यांनी वर्तविली. ज्वालामुखी आणि भूकंप झाल्याने आतील भाग वर येऊन जलाशय मागे लोटला गेला व हजारो समुद्रजीव नष्ट झाले. त्याचा पुरावा या टेकडीवरील जीवाश्म देतात, असेही डॉ. वातिले यांनी सांगितले.