शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 07:03 IST2025-03-21T07:02:33+5:302025-03-21T07:03:00+5:30
२५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार
मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले. राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ निर्माण करून देशाच्या अस्मिताचिन्हाचा गौरव करणारे राम सुतार हे शिल्पकलेतील भीष्माचार्य आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले.