शून्य कचरा मोहिमेत शाळाही सहभागी होणार

By Admin | Updated: June 30, 2016 03:16 IST2016-06-30T03:16:15+5:302016-06-30T03:16:15+5:30

महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.

Schools will also participate in zero waste campaign | शून्य कचरा मोहिमेत शाळाही सहभागी होणार

शून्य कचरा मोहिमेत शाळाही सहभागी होणार


ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. परंतु, हे अभियान न राहता ही स्वच्छता चळवळ व्हावी व यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महापौर संजय मोरे यांनी बुधवारी गडकरी रंगायतन येथे झालेल्या मार्गदर्शनपर बैठकीत व्यक्त केला.
महानगरपालिकेने ठाणे महापौर पुरस्कार परिसर सुधारणा योजना जाहीर करून ती गृहसंकुले व झोपडपट्टी अशा दोन गटांत घेण्याचे निश्चित केले आहे. ती फक्त १ जुलैपुरतीच मर्यादित न राहता कायमस्वरूपी चळवळ निर्माण व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चितच मोलाचा ठरू शकतो. यासाठी ठाणे महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महापालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित, मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक गडकरी रंगायतन येथे आयोजित केली होती. या बैठकीत काँग्रेसचे गटनेते राजन किणे, आरोग्य समिती सभापती पूजा वाघ, शिक्षण समिती सभापती प्रभा बोरीटकर,अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, उपायुक्त संजय हेरवाडे, संदीप माळवी, मनीष जोशी, आर निसर्ग फाउंडेशनच्या लता घनश्यामनानी, डॉ. केळशीकर व जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रा. नीलिमा कुलकर्णी व ६०० मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विद्यार्थी हा या देशाची भावी पिढी असून शालेय वयातच मुलांना घनकचरा व्यवस्थापन, पर्यायाने स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देता यावे तसेच वृक्षलागवड, शून्य कचरा मोहीम आदींची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पालकांनी दिलेल्या शिक्षणापेक्षा गुरूंनी दिलेल्या शिक्षणानुसार विद्यार्थी घडत असतो व त्यानुसारच वर्तणूक करत असतो. त्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच दैनंदिन सवयी लागाव्यात, यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले.
महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या परिसर सुशोभीकरण योजनेत सहभागी व्हावे, वृक्षलागवड, शून्य कचरा मोहीम, धोकादायक इमारतीसंदर्भात घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Schools will also participate in zero waste campaign