‘फी’साठी शाळकरी मुलांना उन्हातान्हात शिक्षा

By Admin | Updated: November 7, 2014 23:30 IST2014-11-07T22:34:39+5:302014-11-07T23:30:22+5:30

शानभाग विद्यालयात निर्दयतेचा कळस : संतप्त पालकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

School fee for teenage school children | ‘फी’साठी शाळकरी मुलांना उन्हातान्हात शिक्षा

‘फी’साठी शाळकरी मुलांना उन्हातान्हात शिक्षा

सातारा : येथील केएसडी शानभाग विद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुल्क न दिल्याने शाळा प्रशासनाने २५ विद्यार्थ्यांना शुक्रवारी गेटमधून शाळेत प्रवेश दिला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांना घेराव घातला. दरम्यान, पालकांची इच्छा असेल तर त्यांना झेडपी शाळेत प्रवेश उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
कर्मवीर अण्णांनी ज्ञानाची गंगा गोरगरिबांच्या घरात पोहोचवली. त्याच साताऱ्यात केवळ अन्यायकारक फी भरली नसल्याने मुलांना शाळेने बाहेर उभे केले, अशी संतापजनक प्रतिक्रिया पालकांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत पालकांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी मुले नेहमीप्रमाणे शाळेत गेली. मात्र, अचानकपणे फी दिली नसल्याचे कारण पुढे करत शानभाग शाळेच्या प्रशासनाने या मुलांना गेटमधून शाळेत प्रवेश दिला नाही. काही विद्यार्थ्यांचे पालक यावेळी हजर नव्हते. लहान मुले उन्हात फिरत होती. गेटबाहेर बेवारसाप्रमाणे फिरत होते. इतर पालकांकडून ही माहिती मिळाल्यावर या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. याठिकाणी एकत्र जमून पालकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरविले. मुलांना सोबत घेऊन पालक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी नियोजन भवनातील बैठकीत होते. ही बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत व शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे नियोजन भवनाच्या बाहेर पडताच बाहेर उभ्या असलेल्या पालकांनी त्यांना घेराव घातला. या अधिकाऱ्यांसमोर पालकांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला. शानभाग शाळेने मुलांना प्रवेश नाकारून मुलांचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई २००९) ची पायमल्ली केली आहे. जिल्हा प्रशासन याप्रकरणी संबंधित शाळेवर काय कारवाई करणार?, याचे उत्तर द्या, अशा शब्दांतच पालक जिल्हाधिकाऱ्यांसमोर पोटतिडकीने प्रश्न मांडू लागले. यावेळी अधिकारी एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप पालकांनी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी संताप व्यक्त केला. आम्ही कायद्याप्रमाणे कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.
शाळेने जून महिन्यापासून फीमध्ये वाढ केली आहे. ११०० रुपये फी घेण्यात येत होती. त्यात वाढ करून ही फी ४४०० रुपये केली. ही वाढ अतिशय अन्यायकारक आहे. शानभागचे शाळा प्रशासन वारंवार फी वाढ करत आहे. पालकांना विश्वासात न घेता, फी वाढ करत आहेत. मुलांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला असल्याने मुलांचा शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार संबंधित शाळेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी या बैठकीत केली. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी पालकांना दिले. (प्रतिनिधी)

तुम्ही कधी सीईओंना पाहिले का...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्याबाहेर संतप्त पालक आणि काही संघटनांचे पदाधिकारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत आणि शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्यांशी चर्चा करत होते. याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शंकर शिंदे यांनी आम्ही ‘सीईओं’ना या अनुषंगाने भेटलो होतो, त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिले होते,’ असे सांगितले. यावर जी. श्रीकांत अतिशय संतप्त झाले आणि त्यांनी ‘आपण कधी मला पाहिले आहे का... उगाच चुकीचे काही तरी बोलू नका,’ असा सवाल केला. यामुळे संतप्त पालक आणि संघटनांचे पदाधिकारी थोडे शांत झाले.



उपशिक्षणाधिकाऱ्यांनाही घेराव...
संतप्त पालक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनाही घेराव घातला. मात्र, त्यांना काहीच माहिती नसल्यामुळे अधिक बोलता आले नाही.
परिणामी पालकांना नियोजन भवनातील बैठक संपेपर्यंत ताटकळत बसावे लागले. बैठक संपल्यानंतर मात्र, पालकांनी अधिकाऱ्यांनाच घेराव घातला.

पोलिसांचीही केली तक्रार
शानभाग विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यानंतर विद्यालय आवारात गोंंधळ झाला. पालक संतप्त झाल्यानंतर येथे शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना पाचारण केले. येथे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आले. मात्र, त्यांनीही हा विषय शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असल्यामुळे आपण यामध्ये काहीही हस्तक्षेप करत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे पालक संतप्त झाले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.
पालकांनी पांढरे यांची तक्रार थेट जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करतच येथे आता पोलीस अधीक्षकांनाच बोलवा, तरच आम्ही हलणार, असा पवित्रा घेतला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी थोडी कडक भूमिका घेतल्यानंतर पालक शांत झाले.
याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी संस्थेच्या आँचल शानभाग-घोरपडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी रमेश शानभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले. मात्र, शानभाग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


शानभाग शाळेत जे घडले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. याची पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
- जी. श्रीकांत,
मुख्य कार्यकारी अधिकारी

पालकांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांनी निवेदनही दिले आहे. या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- अश्विन मुदगल,
जिल्हाधिकारी


शानभाग शाळेचे संचालक मंडळ मुलांवर अन्याय करत आहेत. बेसुमार फी वाढ करण्यात येत आहे. याबाबत पालकांना विचारात घेतले जात नाही. सावकारी पद्धतीने फीची वसुली केली जात आहे.
- शैलेंद्र सावंत, पालक

Web Title: School fee for teenage school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.