गरीबीला कंटाळून स्कॉलर विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Updated: August 19, 2016 23:01 IST2016-08-19T23:01:12+5:302016-08-19T23:01:12+5:30
दहावी बोर्ड परीक्षेत ९२टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

गरीबीला कंटाळून स्कॉलर विद्यार्थिनीची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १९ : दहावी बोर्ड परीक्षेत ९२टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नवा मोंढा जाधववाडी येथील मयूरपार्क येथे ही घटना घडली.
कल्याणी भरतसिंग जाधव(१६,रा. मयुरपार्क, जाधववाडी)असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कल्याणी ही जाधववाडी येथील सिंधू मेमोरीयल माध्यमिक विद्यालयातून यावर्षी दहावीमध्ये उत्तीर्ण झाली.
कोचिंग क्लासेसशिवाय तीने दहावी बोर्ड परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. दहावीनंतर तिने छत्रपती महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. त्यांच्या घरची परिस्थिती अंत्यंत हालाखीची आहे. तिचे वडिल हॉटेलमध्ये सात हजार रुपये प्रति महिन्याने सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर तिचा मोठा भाऊ निलेश बी.एस्सी.प्रथम वर्र्षात शिकत आहे. तो घरखर्चाला मदत व्हावी, यासाठी खाजगी कंपनीत रात्रपाळीची नोकरी करतो. कल्याणी ही सतत घरच्या हालाखीच्या परिस्थितीबाबत आईवडिल आणि भावाकडे चिंता व्यक्त करीत होती.
पोटाला चिमटा घेऊन तिच्या आईवडिलांनी नुकतेच घर बांधलेले आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने विज्ञान शाखेचा खर्च परवडणारा नाही. असे म्हणून तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आज सकाळी नेहमीप्रमाणे तिचा भाऊ रात्रपाळीची ड्युटी करुन घरी आला आणि तो एका खोलीत झोपला. तर त्याचे वडिल ड्युटीला गेले होते. आई घरकामात व्यग्र होती.
यावेळी कल्याणीने खालच्या खोलीतील छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार दुपारी १२ वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी कल्याणीला तपासून मृत घोषित केले. याविषयी हर्सूल ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पो.निरीक्षक वसीम हाश्मी म्हणाले की, कल्याणी या गुणी विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने तिच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले.
पोलीस उपायुक्तांनी केला होता सत्कार
प्रतिकुल परिस्थितीत कल्याणीने ९२टक्के गुण संपादन केल्याबद्दल शाळेच्यावतीने २ आॅगस्ट रोजी मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंत तिचा सत्कार पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या हस्ते करण्यात आला होता. शाळेतील वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत ती सतत अव्वल राहात होती असे तिच्या शिक्षकांनी सांगितले.