हिरवाईने नटलेला निसर्गरम्य बनेश्वर पर्यटकांना घालतेय साद़़
By Admin | Updated: August 17, 2016 01:04 IST2016-08-17T01:04:00+5:302016-08-17T01:04:00+5:30
पावसाने श्रावणात प्रवेश केला की, हिरवाईच्या बहराला एक उत्सवाचे रूप येते. व्रत-वैकल्याचे दिवस सुरू होतात. सण-उत्सव चैतन्य घेऊन येतात

हिरवाईने नटलेला निसर्गरम्य बनेश्वर पर्यटकांना घालतेय साद़़
वैभव भूतकर, नसरापूर
पावसाने श्रावणात प्रवेश केला की, हिरवाईच्या बहराला एक उत्सवाचे रूप येते. व्रत-वैकल्याचे दिवस सुरू होतात. सण-उत्सव चैतन्य घेऊन येतात. जणू पावसामागे सर्वत्र प्रसन्नता दाटून येते, अशा या भारलेल्या वातावरणातच मग एकांतात, झाडा-फुलांच्या सान्निध्यात, रम्य शिवालयी बनेश्वरला बेत ठरलाच पाहिजे.
बनेश्वर तसे बाराही महिने सहलीचे ठिकाण; पण सहलीपेक्षा ज्याला तिथली नीरव शांतता, प्रसन्नता आणि सौंदर्य अनुभवायचे असेल, त्याने श्रावणातल्या कुठल्याही वारी बनेश्वरची वाट धरावी. पुणे-बंगलोर महामार्गावरील नसरापूर हे गाव पुण्यापासून केवळ ३० किलोमीटरवर. इथे येण्यासाठी स्वारगेटहून सुटणाऱ्या एसटी किंवा पीएमपीच्या बस सोयीच्या आहेत. नसरापूरला उतरले की, एक किलोमीटर चालण्याच्या अंतरावर बनेश्वर मंदिर आहे.
चालत निघालात तर वाटेवरील वनविभागाच्या हद्दीबरोबरच बनेश्वरबनाची कल्पना येते. शिवगंगा नदीकाठच्या या भागात फार पूर्वीपासून घनदाट बन आहे. या बनामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रफुल्लित होते. जुन्या पिढीतील इतिहास संशोधक आणि संपादक वासुदेव भावे यांनी १९३३ मध्ये लिहिलेल्या ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात या स्थळाचे वर्णन आहे. या मंदिराअलीकडेच पेशव्यांचा राहता वाडाही होता. सध्या त्याचे जोते आणि भिंतींचे काही अवशेष दिसतात. प्रवेशद्वाराची कमान, भोवतीने तट-ओवऱ्या, दीपमाळ, पाण्याने भरलेली मोठाली दोन कुंडे, नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या प्रकाराची रचना.
हे चिरेबंदी बांधकाम पाहत सभामंडपात आल्यावर भली मोठी घंटा आहे. ज्यावर १६८३ साल आणि क्रूस कोरलेला आहे. वसईच्या लढाईत मराठ्यांनी पोतुर्गीजांचा जो पराभव केला, या विजयाचे प्रतीक म्हणून आणलेल्या अनेक मोठाल्या पोतुर्गीज घंटा आपल्याकडील अनेक मंदिरात घणघणत आहेत. बनेश्वरची घंटाही याच माळेतील.