नाईक महामंडळात घोटाळे

By Admin | Updated: May 18, 2016 05:16 IST2016-05-18T05:16:05+5:302016-05-18T05:16:05+5:30

विमुक्त जमाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमध्ये गेल्या १० वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत.

Scam in Naik Mahamandal | नाईक महामंडळात घोटाळे

नाईक महामंडळात घोटाळे

यदु जोशी,

मुंबई-वसंतराव नाईक विमुक्त जमाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमध्ये गेल्या १० वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत. या घोटाळ्यांची पाळेमुळे काही राजकीय व्यक्तींपर्यंत जात असल्याचे बोलले जाते.
अहमदनगर, बीड, ठाणे, सांगली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये झालेले घोटाळे समोर आले असून, आणखी काही जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने घोटाळे झाले असण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांत महामंडळामार्फत सुमारे ६० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करताना बोगस प्रकरणे बनवून पैसे लाटण्यात आल्याच्या तक्रारी आता पोलिसांत होऊ लागल्या आहेत.
ठाणे येथील महामंडळाच्या कार्यालयात बोगस कोटेशन बनवून मासेमारी व्यवसायासाठीची कर्ज प्रकरणे बनविण्यात आली. शांताराम राठोड या व्यक्तीने ती बनविली. या घोटाळ्यात तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक प्रल्हाद गजभिये यांचे नावही समोर आले आहे. कर्जाचे धनादेश लाभार्र्थींच्या नावे न काढता, ते राठोडच्या नावे काढून पुढे ती रक्कम गजभिये यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे, या प्रकरणी दोन आठवड्यांपूर्वी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात महामंडळाकडून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यात व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याच्या योजनेत मोठे घोटाळे झाले. एकूण ५० प्रकरणे तयार करण्यात आली. त्याचे २.५० कोटी रुपये हे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत व्यवस्थापक असलेला योगेश सानप याच्या खात्यात जमा झाले. तो आणि त्याचा भाऊ गणेश सानप, तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र कांबळे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद चव्हाण, प्रल्हाद गजभिये आणि जिल्हा व्यवस्थापक अशोक नागरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातही अशीच प्रकरणे तयार करण्यात आली. महामंडळाचे एक कोटी रुपये योगेश सानपच्या खात्यात जमा करण्यात आले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर, ते लाभार्र्थींच्या नावावर दाखवून महामंडळाला पैसा परत देण्यात आला. महामंडळाने केलेल्या चौकशीच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. सानप बंधू हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे निकटवर्ती मानले जातात. सांगली जिल्ह्यात कर्जवाटपासाठी पाठविण्यात आलेले १८ लाख रुपये महामंडळाच्या माजी अध्यक्षांच्या तोंडी सूचनेवरून आयोजनासाठी वापरण्यात आले. चौकशीत कांबळे आणि भालेराववर ठपका ठेवण्यात आला.
>एकाच समाजाच्या लोकांना लाभ
विमुक्त जमाती व भटक्या जमातींसाठी हे महामंडळ असले, तरी विशिष्ट जिल्ह्यांमध्ये एकाच समाजाच्या लाभार्र्थींना लाभ देण्यात आला.
बोगस कर्ज प्रकरणे बनवून निधी काही खासगी व्यक्तींच्या बँक खात्यात वळविण्यात आला.
काही जिल्ह्यांमध्ये वसंतराव नाईक महामंडळामार्फत पैसा मिळवून देणाऱ्या टोळ्याच कार्यरत होत्या, अशी माहिती समोर येत आहे.
दोन-तीन दिवसांत महामंडळाकडून सांगलीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदेडमधील कर्जवाटपात गैरप्रकार झाले आहेत. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. बन्सोड यांनी सांगितले की, इतर काही जिल्ह्यांत असे प्रकार घडले काय, याची चौकशी केली जाईल.

Web Title: Scam in Naik Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.