बोला, विदर्भ कधी देता?....वेगळ्या विदर्भासाठी 'एसएमएस'चा पाऊस
By Admin | Updated: July 31, 2016 20:24 IST2016-07-31T20:24:12+5:302016-07-31T20:24:12+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आतापर्यंत रस्त्यांवर लढण्यात येणारे आंदोलन थेट नेत्यांपर्यंतच पोहोचले. विदर्भातील हजारो नागरिकांनी रविवारी मोबाईल हँग आंदोलना

बोला, विदर्भ कधी देता?....वेगळ्या विदर्भासाठी 'एसएमएस'चा पाऊस
वेगळ्या विदर्भासाठी 'एसएमएस'चा पाऊस : 'मोबाईल हँग' आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद
ऑनलाइन लोकमत
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आतापर्यंत रस्त्यांवर लढण्यात येणारे आंदोलन थेट नेत्यांपर्यंतच पोहोचले. विदर्भातील हजारो नागरिकांनी रविवारी मोबाईल हँग आंदोलनाअंतर्गत मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना थेट मोबाईलवरच संपर्क केला. विदर्भातील ११ जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी वेगळ्या विदर्भाची पूर्तता कधी होणार या आशयाचे 'एसएमएस' जनप्रतिनिधींना पाठविले.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता रस्त्यासोबतच इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे १ लाखांहून अधिक ई-मेल देशभरातील नेत्यांना पाठविण्यात आले. आता त्याहून पुढे जात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे रविवारी मोबाईल हँग आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत भाजपाचे नेते व जनप्रतिनिधींना एसएमएस पाठविण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीबाबत आश्वासने दिली होती. परंतु सत्ता स्थापनेनंतर सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडला आहे. भाजपाच्या मंत्री, आमदारांना या एसएमएसच्या माध्यमातून जाब विचारण्यात आले. आम्हाला वेगळा विदर्भ कधी देता असा प्रत्येकाचा एकच प्रश्न होता, असे समितीतर्फे सांगण्यात आले.