सव्वादोनशे चिमुकल्या येणार जन्मदात्याच्या भेटीला

By Admin | Updated: August 1, 2016 07:05 IST2016-08-01T07:05:16+5:302016-08-01T07:05:16+5:30

सोमवारी येथील मध्यवर्ती कारागृहात एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Savvonos Chimukella will be the visitor's birthday | सव्वादोनशे चिमुकल्या येणार जन्मदात्याच्या भेटीला

सव्वादोनशे चिमुकल्या येणार जन्मदात्याच्या भेटीला


नागपूर : कारागृहात बंदिस्त असलेल्यांना भेटता यावे, त्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवता यावा, यासाठी सोमवारी येथील मध्यवर्ती कारागृहात एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या तीन तासात येथील मध्यवर्ती कारागृहात हा अत्यंत भावनिक असा ह्यगळाभेटह्ण कार्यक्रम पार पडेल.
प्रयोगशील अन् संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित असलेले कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी काही दिवसांपूर्वी कैद्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची कल्पना पुढे केली. त्यासाठी सार्वजनिक, स्वयंसेवी संस्थांना मदतीची साद घातली. या पार्श्वभूमीवर १४ जुलैला पुण्यात आदर्श गणेश मंडळ आणि भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकाराने कैद्यांच्या २०० मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कैद्यांच्या मुलांना येरवडा कारागृहात थेट प्रवेश देऊन कैद्यांना त्यांच्यासोबत ४० मिनिटेपर्यंत राहण्याची मुभा दिली. त्यानंतर आता नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात सोमवारी गळाभेट कार्यक्रम पार पडणार आहे.
राज्यातील कारागृहात २९ हजार कैदी बंदिस्त आहेत. अनेक गुन्हेगारांना अटक केल्यानंतर जामीन किंवा पॅरोल मिळालाच नाही. त्यामुळे त्यांची लहानगी मोठी झाली. मात्र, त्यांना आपल्या जन्मदात्यांसोबत मोकळेपणाने भेटता-बोलता आले नाही. जन्मदात्याच्या प्रेमापासून पोरकी झालेल्या मुलांना आणि मुलांच्या कोडकौतुकांपासून वंचित असलेल्या जन्मदात्यांना भेटता यावे, काही वेळ सोबत राहता यावे, म्हणून या अभिनव आणि प्रशंसनीय अशा उपक्रमाला मध्यवर्ती कारागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.

कैद्यांना आनंदाचे भरते
कारागृहातील भेसूर जीवन जगणाऱ्या एकूण कैद्यांपैकी २१७ कैद्यांना सोमवारी त्यांची मुले भेटणार आहेत. त्यामुळे या कैद्यांच्या आनंदाला भरते आले आहे. कैद्याला त्याच्या मुलांचे आणि मुलांना त्यांच्या वडिलांचे (कैदी महिला असेल तर आईचे) प्रेम मिळावे आणि त्यांच्या वर्तनात, विचारात सुधारणा व्हावी, हा या थेट भेटीमागचा हेतू असल्याचे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी लोकमतला सांगितले. या अभिनव उपक्रमामुळे कैद्यांना प्रचंड आनंद झाला असून, आम्हालाही या आयोजनातून एक वेगळी सुखद अनुभूती येत असल्याची प्रतिक्रियाही देसाई यांनी नोंदविली.

Web Title: Savvonos Chimukella will be the visitor's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.