Maharashtra Politics: सत्यजित तांबेंचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, “भाजपपेक्षा तुम्ही काय केले यामध्ये...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 17:51 IST2023-03-07T17:50:02+5:302023-03-07T17:51:35+5:30
Maharashtra News: राहुल गांधींनी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: सत्यजित तांबेंचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, “भाजपपेक्षा तुम्ही काय केले यामध्ये...”
Maharashtra Politics: राज्यासह देशभरात होळी आणि धुळवडीची मोठी धूम पाहायला मिळत आहे. अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी, नेते मंडळी होळी आणि धुळवडीचा आनंद लुटला. यातच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अलीकडेच अपक्ष म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे बंडखोर आमदार सत्यजित तांबे यांनी होळीनिमित्त काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना एक खास सल्ला दिला आहे.
होळीनिमित्त राहुल गांधींना काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न सत्यजित तांबे यांना विचारण्यात आला होता. यावेळी सत्यजित तांबे यांनी, राहुल गांधींना होळीच्या शुभेच्छा देताना एवढेच सांगेन की, राहुलजींनी आणखी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवे. भारत जोडो यात्रेतून त्यांनी हे केलेच आहे. पण अजून त्यांनी लोकांमध्ये मिसळले पाहिजे. लोकांमध्ये आले-गेले पाहिजे. यामुळे लोकांच्या मनातील कटू भावना दूर झाल्या पाहिजेत, असे सत्यजित तांबे म्हणाले.
बुरा न मानो होली है!
एका वृत्त वाहिनीशी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, विरोधक असो वा सत्ताधारी असो, एकत्र येऊन त्यांनी या देशासाठी कसे चांगले काम करता येईल, हे आताच्या पिढीतील लोकांना पाहायचे आहे. भाजपने काय केले? हे ऐकण्यात आता कुणालाही रस राहिलेला नाही. आपण काय करणार आहोत? पुढे तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार आहात? हे ऐकण्यात देशातील जनतेला खऱ्या अर्थाने रस आहे. मला असे वाटते की जुने ते सगळे सोडून आपण काय करू शकतो, यावर त्यांनी काम करायला हवे, असं मला वाटते. बुरा न मानो होली है!, असे सत्यजित तांबे यांनी नमूद केले.
दरम्यान, तत्पूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केले. अनेक लोक येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. परंतु, माझ्या विजयाचे खरे श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे. हे मी सभागृहातही मांडले. इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स’. यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे, असे सत्यजित तांबे म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"