मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्याबाबत नवनवे खुलासे होत आहेत. दरम्यान, खंडणीखोर वाल्मिक कराडलासुद्धा खंडणीसाठी धमकी मिळाली होती. तसेच त्याने जीवाच्या भीतीने खंडणी मागणाऱ्याला तब्बल १५ लाख रुपये दिले होते अशी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संदर्भातील एफआयआर सोशल मीडियावर शेअर करत हा दावा केला आहे.
शिवराज बांगर याने वाल्मिक कराडला वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल वरून, “पैसे दे नाहीतर तुला मारून टाकीन” अशी धमकी दिली होती. तसेच बांगर याला जगमित्रच्या लॉकरमधून १५ लाख रुपये दिले गेले. मात्र कराडला कोणी धमकी देऊ शकत होत हे माझ्या बुद्धीला पटत नाही, असेही अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या संदर्भातील एफआयआर धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात काम करणाऱ्या गणेश उगले याने दिली होती. तसेच शिवराज बांगर हा १ जानेवारी २०२३ रोजी जगमित्र कार्यालयात आला होता आणि त्याने वाल्मिक कराड याने मला १५ लाख रुपये देण्यास सांगितले, असे तो म्हणाला, असे उगले याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, शिवराज बांगर याने १५ लाख रुपये न दिल्यास ठार मारेन, बदनामी करेन अशी धमकी दिल्याचे वाल्मिक कराडने आपल्याचा सांगितल्याचे तसेच जीवाला धोका नको म्हणून त्याला १५ लाख रुपये देण्यास सांगितल्याचा दावा उगले याने या एफआयआरमध्ये केला होता.