Santosh deshmukh sarpanch CM Devendra Fadnavis: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पहिल्या दिवसांपासून उमटत आहेत. या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याचे विधानसभेत सांगितले. त्याचबरोबर बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या तारांनी संतोष देशमुख यांना बांधले होते, त्याचे फोटोही सभागृहात दाखवले. या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, मग भूमाफिया असेल, तरी त्यांच्यावर मकोका लावू, असा इशारा फडणवीसांनी दिला.
गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढणार आणि मकोका लावणार -फडणवीस
फडणवीस म्हणाले की, "मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितलं की, यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय, हे बघायला पाहिजे. मधल्या काळात हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात. हे यापुढे सहन केले जाणार नाही, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो."
"या बीड जिल्ह्यात अशाप्रकारे गुन्हेगारी करणारे जे कोणी असतील. त्यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांना ३०२ तर लागेलच, सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत, हे सगळे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात येईल", अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.
उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करणार; फडणवीसांचा इशारा
डणवीस पुढे म्हणाले की, "दुरान्वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा मदत करताहेत, असे निष्पन्न झालं, तर त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मकोकामध्ये टाकण्यात येईल. आणि बीड जिल्ह्यात वाळू माफिया, वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे जे लोक आहेत. एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल."
"हे जे सगळं प्रकरण आहे, त्यात दोन प्रकार चौकशी आम्ही करणार आहोत. एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची केली जाईल. ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू. जी प्रकरणे समोर येत आहेत, त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.