मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी वाल्मीक कराड याच्या जामिन अर्जावर आज बीडच्या न्यायालयात सुनावणी झाली. कराडच्या वकिलांनी जवळपास पावणेदोन तास युक्तीवाद केला. आज सुमारे तीन तास यावर सुनावणी पार पडली. अॅड. सत्यवृत्त जोशी आणि उज्ज्वल निकम यांच्यात तीन तास युक्तीवाद रंगला होता. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. 30 ऑगस्ट रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडच्या वकिलाने त्याला जामीन का मिळाला पाहिजे, याविषयी युक्तिवाद केला. त्याला आम्ही विरोध केल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. दुसरा आरोपी विष्णू चाटेने देखील दोषमुक्तीसाठी युक्तिवाद केला गेला. यावेळी न्यायालयाचे अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधल्याचे निकम म्हणाले. वाल्मीक कराडला अटकेच्या वेळी अटकेची कारणे सांगितली गेली नाहीत असे कराडचे वकील म्हणाले होते. परंतू आम्ही न्यायालयाला ती बाब निदर्शनास आणून दिली. तसेच सुनील शिंदे यांनी जो वाल्मीक कराडचा मोबाईल फोन आलेला रेकॉर्ड केला होता, तो त्या तारखेला झालाच नसल्याचे कराडचे वकील म्हणाले. यावर आम्ही कराडच्या सीडीआरकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. कराडनेच फोन केल्याची नोंद त्यात असल्याचे दाखवून दिल्याचे निकम यांनी सांगितले.
तसेच शिंदे आणि कराड यांच्यातील झालेले संभाषणाचे पुरावे हे प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला न्यायालयात सादर करू, विष्णू चाटे याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नाही, हे आरोपींच्या वकिलांचे म्हणणे अर्थहीन आहे. मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागतात, आरोपीला नाही. चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयाच्या निदर्शनास आणलेली आहे. खंडणीत त्याने कराडला साथ दिली होती. कराडचा तो उजवा हात होता, असे निकम यांनी यावेळी स्पष्ट केले.