सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:47 IST2025-01-13T17:46:32+5:302025-01-13T17:47:14+5:30
सिडकोच्या पुढील व्यवस्थापकीय बैठकीत अनेक जाचक अटी शिथील करण्याचा विचार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.

सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत
नवी मुंबई - सिडको घरांसाठी अनेक जाचक अटी शिथिल करण्याबाबत सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी संकेत दिले आहेत. त्यात एक घर असतानाही दुसरे घर घेण्याची अट काढण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. लवकरच बोर्ड बैठकीत यावर निर्णय होतील अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
संजय शिरसाट म्हणाले की, खारघर ठिकाणी असलेल्या घरांची किंमत जास्त आहे. सिडकोच्या घरांची काही ठिकाणी किंमती कमी झाल्या पाहिजेत. सिडकोचा यात थोडं नुकसान होईल परंतु सर्वसामान्य माणसांना कर्ज घेताना अडचणी निर्माण होतात. पुढच्या बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही दरांबाबत चांगला निर्णय घेऊ. सिडकोची घरे घेताना भरपूर अटी आहेत. एखाद्याचं एक घर असताना त्याला दुसरं घर घेता येत नाही ही अट कशासाठी हवी, कुटुंबाचा विस्तार होत असतो. वडिलांनी घर घेतलं तर मुलाला घर घेता येत नाही या अटी शिथिल झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय डोमेसाईल प्रमाणपत्राच्या बाबतीत जी अट आहे तो १५ वर्षाचा रहिवासी असावा. त्याचे मतदान कार्ड आहे, आधार कार्ड, तो इथं शाळा शिकलेला आहे. सर्व इथं झालंय पण त्याला घर घेता येत नाही. कुणालाही घर घेता यावे असं धोरण असावं अन्यथा इथला जो मूळ आहे तो आणखी बाहेर फेकला जाईल. आम्ही मराठी माणसांबद्दल बोलायचे पण तो लांब फेकला जातो. एकीकडे सहानुभूती दाखवायची आणि त्याला लांब फेकायचे हे बरोबर नाही. त्या अटीही शिथिल करण्याचा प्रयत्न करू असं शिरसाट यांनी सांगितले.
सिडकोचे घर सामान्यांच्या आवाक्याबाहेर!
सिडकोने विविध नोडमधील गृह प्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या. नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत. सिडकोने माझे पसंतीचे सिडको घर या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार घरांची योजना जाहीर केली होती. यात तळोजा, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, कळंबोळी, पनवेल आणि वाशी येथील गृह प्रकल्पांतील घरांचा समावेश आहे. खारघर नोडमध्ये तीन ठिकाणच्या घरांचा या योजनेत समावेश केला आहे. यापैकी सेक्टर २ ए येथील घरांच्या किमती सर्वाधिक म्हणजेच ९७ लाख इतक्या आहेत. त्यापाठोपाठ वाशीतील ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या घराची किंमत ७४ लाख इतकी आहे.