Santosh Deshmukh Krushna Andhale: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येमध्ये सहभागी असलेल्या कृष्णा आंधळेचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली. तेव्हापासून कृष्णा आंधळे गायब आहेत. या प्रकरणातील इतर आरोपी पोलिसांसमोर हजर झाले, मात्र कृष्णा आंधळे शोध घेऊनही सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या जिवंत असण्याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. आता महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनीच असण्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलीस आणि सीआयडीकडून घेतला जात आहे. कृष्णा आंधळेकडे मोबाईल होता. तो त्याने नष्ट केल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा दावा काही आमदारांकडून करण्यात आला होता. आता सरकारमधील मंत्र्यांनीच तो जिवंत आहे की नाही याबद्दल शंका असल्याचे म्हटले आहे.
कृष्णा आंधळेबद्दल मंत्री शिरसाट काय बोलले?
संजय शिरसाट म्हणाले, "मला शंका आहे की, कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही. कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करत आहेत, सगळ्या टीम जाताहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही. त्यामुळे शंका व्यक्त करायला वाव आहे. परंतु त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे."
"बीडचे पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या सर्व टीम पाठवल्या आहेत. महाराष्ट्रातील बाकीच्या टीमही त्याच्या मागावर आहेत. मग तपास न लागण्याचं कारण काय, हे थोडं गुलदस्त्यात आहे. म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की, त्याचा खून झाला की काय? अशी शंका मला आहे", असे शिरसाट यांनी सांगितले.
'या' तीन नेत्यांनीही व्यक्त केला आहे संशय
यापूर्वी संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळेची हत्या करण्यात आली आहे. तो जिवंत नाहीये, असा दावा केलेला आहे. त्याचबरोबर सुरेश धस यांनीही त्यांच्या जिवंत असण्याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही "कृष्णा आंधळे जिवंत नाहीये. त्याची हत्या झालेली आहे", असा अधिवेशन सुरू झाल्यानंतर केला आहे.