देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलेल्या सन्मानावरून राज्यातील राजकारणात वादळ उठलं आहे. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने शिवसेना ठाकरे गट कमालीचा नाराज झाला असून, संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्याविरोधातच टीकास्त्र सोडलं आहे. तर इतर नेतेमंडळींकडूनही आता या विषयावर प्रतिक्रिया येत असून, शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या विषयी आपली भूमिका मांडली आहे. दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
याबाबत सोशल मीडिया माध्यम एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत यांच्यासारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली आहे. त्यांनी सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही. तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत यांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, अशी शक्यता रोहित पवार यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना मंगळवारी दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक केले. दरम्यान, शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार आणि कौतुकामुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला असून, ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्याच्या शत्रूंना अशा प्रकारे पुरस्कार देणं आम्हाला पटलेलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.