मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळलेच, असं सूचक विधान राऊत यांनी केलं.राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंसह अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकीटं कापण्यात आली होती. पंकजा मुंडेंना बीडच्या परळीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु आहे. सध्या पंकजा मुंडे आणि बहुजन समाजातील काही लोकप्रतिनिधी यांच्यात एक वेगळा गट तयार करण्यावर एकमत झालं आहे असल्याची माहिती आहे.
'पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळेलच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 13:23 IST