Sanjay Raut vs BJP: "राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण सुरु आहे. त्यामुळेच मविआचे घोडे अडले आहे. मविआमधील तिन्ही पक्ष आपापले घोडे दामटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांचा शरद पवरांच्या उमेदवारीला विरोध असताना, धूर्त संजय राऊत शरद पवारांचे नाव सातत्याने पुढे करत आहेत. उबाठा गटाचे प्रवक्ते असूनही आपली खासदारकीची टर्म संपल्यानंतर खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी उबाठा गटाच्या प्रियांका चतुर्वेदींना डावलून शरद पवारांचे नाव पुढे करण्याची धूर्त खेळी संजय राऊत खेळत आहेत. मात्र उबाठा गटाच्या उमेदवारीबद्दल राऊतांच्या शब्दांना काडीचीही किंमत राहिलेली नाही," अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"राऊत आणि उबाठा गट हे वारंवार माती खात असल्यानेच मतदारांनी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अशा लागोपाठच्या निवडणुकांमध्ये त्यांना घरी बसवले आहे. परराष्ट्र धोरणासंदर्भात अज्ञानी राऊत यांनी राजकारण करू नये. राष्ट्रीय हित आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असून त्यांनी संवेदनशील अशा परराष्ट्रविषयक मुद्द्यांमध्ये नाक खुपसू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वाखाली राष्ट्रीय हित, सामरिक संतुलन आणि जागतिक स्थैर्य या मुद्द्यांना प्राधान्य देत वेळोवेळी उभय देशांतील संवादाच्या बळावर आज भारत जागतिक स्तरावर स्वाभिमानाने उभा आहे. जागतिक स्तरावरील युद्धजन्य स्थितीला एपस्टिन फाईल्सशी जोडणे हे केवळ राऊतांचे कल्पनारंजन आहे. त्यांची कल्पकशक्ती सुमार दर्जाची असून बौद्धिक दिवाळखोरीचे त्यातून दर्शन घडते," अशी बोचरी टीकाही बन यांनी केली.
मविआच्या पत्रकार परिषदेत उद्धवसेना 'गैरहजर'
राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यातील विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अखेरच्या क्षणापर्यंत कायम असल्याचे पाहायला मिळाले आहे. वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसच्या हायकमांडने पाठिंबा दिला. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. पण या पत्रकार परिषदेला उद्धवसेनेकडून कोणीही नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
Web Summary : BJP criticizes Sanjay Raut, alleging power struggles within Maha Vikas Aghadi over Rajya Sabha seats. Raut is accused of prioritizing personal gain over party interests. Uddhav Sena's absence from a MVA press conference sparks speculation.
Web Summary : भाजपा ने संजय राऊत पर राज्यसभा सीटों को लेकर महा विकास अघाड़ी में सत्ता संघर्ष का आरोप लगाया। राऊत पर पार्टी हितों से ऊपर व्यक्तिगत लाभ को प्राथमिकता देने का आरोप है। एमवीए की प्रेस कॉन्फ्रेंस से उद्धव सेना की अनुपस्थिति से अटकलें तेज।