नाशिक - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा चुकीचा जेटा पोस्ट केल्याप्रकरणी वादात अडकलेले विश्लेषक संजय कुमार यांच्या अडचणीत भर पडली आहे. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिकमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय कुमार यांच्याबाबत तक्रार दिली. नाशिकच्या देवळाली मतदारसंघाबाबत संजय कुमार यांनी चुकीचा डेटा दिला होता. त्याशिवाय अनेक विधानसभा मतदारसंघाचा चुकीचा डेटा देत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संजय कुमार यांच्या पोस्टमुळे मतचोरीबाबत विरोधकांच्या दाव्याला बळ मिळाले होते.
संजय कुमार हे लोकनीती-सीएसडीएस संस्थेचे समन्वयक आहेत. सीडीएस ही संस्था निवडणूक डेटा आणि सामाजिक अभ्यास यासाठी ओळखली जाते. नाशिकच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाने एक्सवरून संजय कुमार यांच्यावरील कारवाईची माहिती दिली. त्यात लिहिलंय की, सीएसडीएसचे संजय कुमार यांनी २०२४ चा लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेचे १२६ देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांबाबत चुकीची माहिती पोस्ट केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी अचूक माहितीसाठी फक्त निवडणूक आयोगाची वेबसाईट पाहावी असं त्यांनी सांगितले.
संजय कुमार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये महाराष्ट्र विधानसभा जागांवर कमी मतांची माहिती दिली होती. एक्स वरची ही पोस्ट डिलीट केल्यानंतर संजय कुमार यांनी माफीही मागितली आहे. 'त्यांच्या टीमने डेटाचा चुकीचा अर्थ लावला होता', असे त्यांनी म्हटले. त्यांनी १७ ऑगस्ट रोजी हे ट्विट केले होते. भाजपाने संजय कुमार यांनी पोस्ट डिलीट केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली. 'ही तीच संस्था आहे ज्यावर राहुल गांधी विश्वास ठेवतात' असं भाजपाने म्हटले होते.
काय केला होता दावा?
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दोन जागांवर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या प्रचंड घटली आहे' असा दावा संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये केला होता. 'महाराष्ट्रातील विधानसभा क्रमांक ५९ रामटेकमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चार लाख ६६ हजार २०३ मतदार होते तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या दोन लाख ८६ हजार ९३१ पर्यंत कमी झाली, असे या पोस्टमध्ये संजय कुमार यांनी म्हटले होते. कुमार यांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या जागेवर एक लाख ७९ हजार २७२ म्हणजेच ३८.४५ टक्के मते कमी झाली. त्याचप्रमाणे त्यांनी देवळाली विधानसभा जागेचा डेटा दिला होता. त्यांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्रमांक १२६ देवळालीमध्ये चार लाख ५६ हजार ७२ मते होती. तर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या दोन लाख ८८ हजार १४१ पर्यंत कमी झाली. संजय कुमार यांच्या मते, देवळाली मतदारसंघावर एक लाख ६७ हजार ९३१ म्हणजेच ३६.८२ टक्के मते कमी झाली.