संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:16 IST2025-07-09T16:11:16+5:302025-07-09T16:16:20+5:30
Eknath Shinde on Sanjay Gaikwad : खराब अन्न दिल्याचा आरोप करून संजय गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला केली मारहाण

संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे
Eknath Shinde on Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कँटिनमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गोंधळ घातला. जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदार गायकवाड यांच्या या कारनाम्याचा मुद्दा विधान परिषदेत शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यांनी संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याचीच मागणी केली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांना या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करायची ती करावी, अशी भूमिका मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत संजय गायकवाडांना खडेबोल सुनावले.
एकनाथ शिंदे म्हणाले...
संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या असतील तर त्यासाठी कायदेशीर कारवाई करता येऊ शकते असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले. मारहाण करणे हे पर्याय असू शकत नाही असेही शिंदे स्पष्टपणे म्हणाले. "जे चुकीचं असेल त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. पण मारहाण करणं योग्य नाही. मी मुद्द्यावर संजय गायकवाडला समज देईन. मी त्याला आताही सांगितलं आहे की, असं करणं योग्य नाही. आम्ही याचं समर्थन करत नाही" अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाडांचे कान टोचले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
"मी त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडीओ मी स्वतः बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आपल्या सगळ्यांची आणि आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. "माहिती अशी आली की आमदार निवासातील व्यवस्था नीट नव्हती. भाजी वास मारत होती. या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते. त्याच्यावर कारवाई करता येते. तो वेगळा मुद्दा आहे. अध्यक्ष महोद, आमदार निवासामध्ये काहीही अनियमितता असेल, तर आपण स्वतः लक्ष घालावं," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.