सांगली - काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 18:52 IST2016-08-05T18:52:37+5:302016-08-05T18:52:37+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरविण्याचा जिल्हा न्यायालयाचा निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

सांगली - काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी अपात्र
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ५ : महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरविण्याचा जिल्हा न्यायालयाचा निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर २००८ मधील मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीत आवटी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती नसताना त्यांनी निवडणूक लढविली होती. त्याविरोधात पराभूत उमेदवार आबा पाटील व मिरजेतील मतदार सलाम शेख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हा न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविल्यानंतर आवटी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मिरजेतील प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश आवटी विजयी झाले होते. आवटी यांना मिरज कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी २०११ मध्ये मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षे दहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. उमेदवारी अर्ज छाननीवेळी कुणीही त्यांच्या अर्जाबाबत हरकत घेतली नव्हती. त्यामुळे ते निवडणुकीत पात्र ठरले. त्यानंतर निवडूनही आले. छाननीवेळी त्यांच्या शिक्षेला स्थगिती नव्हती. त्यामुळे याच मुद्यावर या प्रभागातील पराभूत उमेदवार आबा पाटील यांनी याचिका दाखल केली होती.