साहित्य समीक्षेचा समतोल प्रवास़़!
By Admin | Updated: January 26, 2015 04:05 IST2015-01-26T04:05:49+5:302015-01-26T04:05:49+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे एक फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेल्या हातकणंगलेकर यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयात बी. ए. केले. विद्यापीठाच्या एलिस पारितोषिकाचे ते मानकरी ठरले होते

साहित्य समीक्षेचा समतोल प्रवास़़!
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे एक फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेल्या हातकणंगलेकर यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयात बी. ए. केले. विद्यापीठाच्या एलिस पारितोषिकाचे ते मानकरी ठरले होते. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि मराठी विषयात एम. ए. केले. सांगलीचे विलिंग्डन महाविद्यालय आणि धारवाड महाविद्यालयात सुमारे ४० वर्षे इंग्रजी वाङ्मयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. ‘विलिंग्डन’चे प्राचार्यपदही त्यांनी भूषविले.
आस्वादक, सुजाण आणि समतोल समीक्षक, अशी प्रतिमा असणाऱ्या हातकणंगलेकरांच्या लेखनाने मराठी समीक्षेत मोलाची भर घातली. प्रतिभेच्या नवनव्या उन्मेषांचे स्वागत आणि गुणवंत साहित्याची पाठराखण हा त्यांचा प्रकृतीधर्म होता. त्यातूनच त्यांनी सिद्धहस्त लेखक श्री. दा. पानवलकर, जी. ए. कुलकर्णी, चारूता सागर यांच्या लेखनाचे विविध पैलू रसिकांसमोर आणले. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक असले तरी, त्यांनी आधुनिक मराठी साहित्यावर नितांत प्रेम केले. अनेक चर्चासत्रे, परिसंवाद, संमेलने यामधून त्यांनी सातत्याने अभ्यासकाच्या भूमिकेतूनच साहित्यविषयक प्रश्नांचा ऊहापोह केला.
धारवाड येथे असताना जी. ए. कुलकर्णी यांच्याशी जमलेले मैत्र त्यांनी अखेरपर्यंत जपले. धारवाड येथे ‘जी. एं’चे स्मारक व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कविवर्य ग्रेस आणि ज्येष्ठ विचारवंत ग. प्र. प्रधान यांच्याशीही त्यांचा विशेष स्नेह होता.
‘साहित्यातील अधोरेखिते’, ‘लघुकथा : रूप आणि परिचय’, ‘साहित्यविवेक’, ‘भाषणे-परीक्षणे’ ही पुस्तके त्यांच्या समतोल आणि निकोप समीक्षादृष्टीचा परिचय करून देतात. ‘वाङ्मयीन शैली व तंत्र’, ‘मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप’, ‘मराठी समीक्षा’ या ग्रंथांसह ललित मासिकात प्रकाशित झालेल्या निवडक लेखांचेही त्यांनी संपादन केले.
साहित्य अकादमीच्या ‘मेकर्स आॅफ इंडियन लिटरेचर’ या मालिकेत त्यांनी वि. स. खांडेकर आणि जी. ए. कुलकर्णी यांचा परिचय करून दिला. गो. नी. दांडेकर यांचे ‘माचीवरचा बुधा’, व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘सती’, प्रेमानंद गज्वी यांचे ‘किरवंत’ आदी नाटकांचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे.
अनेक नामवंत व नवोदित लेखकांच्या पुस्तकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिली. ‘साहित्यसोबती’, ‘आठवणीतील माणसे’ ही
व्यक्तिचित्रे आणि ‘उघडझाप’ या आत्मचरित्रातून त्यांचा मृदू स्वभाव आणि साहित्याचा गाढा व्यासंग दिसतो. (प्रतिनिधी)