‘एनआयए’कडून समीरची चौकशी

By Admin | Updated: September 21, 2015 00:31 IST2015-09-21T00:26:26+5:302015-09-21T00:31:36+5:30

पानसरे हत्या प्रकरण : प्रेयसीवरही प्रश्नांचा भडिमार

Samira's inquiry by 'NIA' | ‘एनआयए’कडून समीरची चौकशी

‘एनआयए’कडून समीरची चौकशी


कोल्हापूर : मडगाव-गोवा बॉम्बस्फोटांतील फरार आरोपी रूद्रगौंडा पाटील याच्याशी संशयित समीर गायकवाड याचे काही संबंध आहेत का, याची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून रविवारी पहाटे कोल्हापुरात दाखल झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित समीर गायकवाड याची कसून चौकशी केली. त्याचबरोबर त्याच्या प्रेयसीचीही चौकशी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एनआयए पथकातील अधिकाऱ्यांनी पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये गायकवाड याला सकाळी सात वाजता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. ‘समीर, दोस्त रूद्रगौंडा पाटील कुठे आहे?’ अशी विचारणा त्याच्याकडे केली. यावेळी त्याने, ‘तुमच्या प्रश्नांनी मी वैतागलो आहे. माझं मलाच काही कळत नाही’, अशी उत्तरे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर काही तासांसाठी त्यास बाहेर नेऊनही चौकशी केल्याचे समजते.
गायकवाडची प्रेयसी ज्योती कांबळे हिच्याकडेही या पथकाने सुमारे चार तास चौकशी केली. मुंबईमध्ये कोठे राहतेस? ‘सनातन’ संस्थेमध्ये साधक म्हणून किती वर्षांपासून कार्यरत आहेस? रूद्रगौंडा पाटीलला ओळखतेस काय? त्याच्या बाबतीत गायकवाडने तुला काही सांगितले आहे का? आदी प्रश्नांची सरबत्ती केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पथकाबाबत गोपनीयता
‘एनआयए’च्या पथकाने सर्वप्रथम पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याकडून संशयित गायकवाड याची माहिती घेतली. डॉ. शर्मा हे दिवसभर या पथकासोबत होते. पथक कोल्हापुरात दाखल झाल्याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. दिवसभर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पोलीस मुख्यालय व विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर तळ ठोकून होते. परंतु, पथक आल्याची कोणीही माहिती दिली नाही. ‘एटीएस’ पथकातील काही अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी पथक अद्याप आलेले नाही. कदाचित रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटे येईल, असे सांगून त्यांनी बाजू काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पथक आले नसल्याची चर्चा होती. (प्रतिनिधी)

प्रश्नांच्या सरबत्तीने समीर वैतागला
रूद्रगौंडा पाटील हा मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहे. त्याचे वास्तव्य कुठे आहे? त्याच्याशी तुझी ओळख कशी झाली? मडगाव बॉम्बस्फोटाची तुला पूर्वकल्पना होती का? बॉम्बस्फोटानंतर तो तुला भेटला कधी? त्याच्याशी तुझे किती वेळा फोनवर बोलणे झाले? तो सध्या कोणाच्या आश्रयाला आहे? आदी प्रश्नांचा भडिमार समीरवर होताच ‘मी आता वैतागलो आहे. माझं मलाच काही कळत नाही,’ अशी उत्तरे त्याने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्याची सर्व बाजूंनी फिरकी घेण्याचा प्रयत्न एनआयएच्या पथकाने केला. पानसरे हत्येसंदर्भातही पथकाने त्याच्याकडे चौकशी केली; परंतु तो तपासाला सहकार्य करीत नसल्याचा अनुभव याही पथकाला आला.

पाचव्या दिवशीही प्रेयसीकडे चौकशी
पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी ‘सनातन’चा साधक संशयित समीर गायकवाड याला दि. १६ रोजी अटक केली आहे.
त्याच्यासह त्याची प्रेयसी ज्योती कांबळे व नातेवाईक अशा तिघांकडे गेले पाच दिवस कोल्हापूर पोलिसांसह पुणे ‘सीबीआय’ व कर्नाटकातील ‘सीआयडी’ पथक कसून चौकशी करीत आहे. पानसरे हत्येसंदर्भात भक्कम पुरावे हाती लागले असल्याचे पोलीस ठामपणे सांगत आहेत.
परंतु, अद्याप पोलिसांनी गायकवाड सोडून कोणालाही अटक केलेली नाही. त्याची प्रेयसी व एक नातेवाईक गेले पाच दिवस चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. परंतु, त्यांना अटक केली नसल्याने पोलिसांच्या तपासाची नेमकी दिशा स्पष्ट होऊ शकलेली नाही.

Web Title: Samira's inquiry by 'NIA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.