समीरच्या सिमकार्डांवरून झाले अनेक प्रश्न उपस्थित
By Admin | Updated: September 27, 2015 05:37 IST2015-09-27T05:37:16+5:302015-09-27T05:37:16+5:30
सिमकार्ड ही ई-डायरी असून सिमकार्डसह मोबाइल कोणी दुरुस्तीला देत नाही. समीर गायकवाडला ३१ मोबाइल सिमकार्डसह दुरुस्तीला दिले, असे त्यांचे म्हणणे आहे

समीरच्या सिमकार्डांवरून झाले अनेक प्रश्न उपस्थित
कोल्हापूर : सिमकार्ड ही ई-डायरी असून सिमकार्डसह मोबाइल कोणी दुरुस्तीला देत नाही. समीर गायकवाडला ३१ मोबाइल सिमकार्डसह दुरुस्तीला दिले, असे त्यांचे म्हणणे आहे; मग या सीमकार्डद्वारे ३१ विचार पुरविणारे कोण आहेत, असा सवाल सरकारी वकिलांनी शनिवारी उपस्थित केला.
ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सिमकार्डांसह मोबाइल सापडले होते. त्याची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला प्रथम वर्ग न्यायाधीश वैशाली व्ही. पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पनवेलमधून सांगलीत मोबाइल दुरस्तीला येतात. हे अंतर किती आहे? पनवेलमध्ये हे मोबाइल दुरुस्त होत नाहीत का? समीरचे सांगलीतील मोबाइल दुरुस्तीचे दुकान २००८ पासून बंद असताना मोबाइल दुरुस्तीला आले कसे, असा प्रश्नांचा भडिमार सरकारी वकिलांनी केला.
तर, यावर युक्तिवाद करताना, पोलिसांनी समीर गायकवाड याला केवळ आवाजाच्या नमुन्यावरून अटक केली आहे. आतापर्यंत १६४ साक्षीदार तपासले, हाती कोणताच धागादोरा नाही, असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. समीरच्या आवाजाचे नमुने पुण्याच्या शाळेतून प्राप्त झाले आहेत. ते त्याचेच आहेत; परंतु त्यामध्ये त्याने पानसरे यांचा खून केल्याचा कोठेच उल्लेख नाही. ‘मी लय पाप केलीत.
समीर रुद्रला फक्त मोबाईलच्या दुकानामुळे ओळखतो. याव्यतिरिक्त त्याचा कसलाही संबध नाही.
तसेच त्याचा गेली आठ वर्षे संपर्कही नाही, असे सांगतानाच मडगाव बॉम्बस्फोटामध्ये १२४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये रुद्रगौडा पाटीलचे कुठेही नाव नाही. पोलिसांकडून जी काही माहिती सांगितली जातेय त्यामध्ये तथ्य नाही, असेही वकील म्हणाले.
--------
प्रत्येक खटल्यावेळी नवीन न्यायाधीश
संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक करून पहिल्यांदा कसबा बावडा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश (क्रमांक ६) आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर केले. यावेळी त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अपर्णा कुमार जैनापुरे यांच्यासमोर हजर केले. त्यानंतर तिसऱ्यांदा पोलिसांनी न्यायाधीश वैशाली पाटील यांच्यासमोर हजर केले. त्यांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. एकाच न्यायालयात तीन वेळी नवीन न्यायाधीश बदलाची चर्चा न्यायालय परिसरात होती.
--
प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात
तक्रार करणार
प्रकाश आंबेडकर यांनी सनातनच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत त्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याचा पवित्रा संस्थेने घेतलेला आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनला दोषी ठरविताना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नक्षलवाद पुरेसा असल्याचे वक्तव्य आंबेडकर यांनी एका चर्चेत केले होते. या प्रकरणी सरकारने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे.
-----
‘सनातन’च्या आठवलेंवर गुन्हा नोंदवा : लेखनातून हिंसेचे समर्थन करणारे ‘सनातन प्रभात’चे डॉ़ जयंत आठवले, त्यांचे कार्यकारी मंडळ, समर्थन करणारे नेते आणि सल्लागारांवर देशद्रोहाचा गुन्हा सरकारने दाखल करावा, सनातन प्रभात आणि त्यांच्या समविचारी संघटनाकडून हिंसक कारवायांसाठी होणारा बहुजनांच्या मुला-मुलींचा वापर रोखावा, हे ठराव जाहीर प्रतिरोध परिषदेत शनिवारी मंजूर करण्यात आले़ त्यांना २६ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंजुरी दिली़ विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र अध्यक्ष पार्थ पोळके यांनी मशाल पेटवून परिषदेचे उद्घाटन केले. ‘दहशतवादी कारवायांसाठी डोकी सनातनी़़़ पोरं-पोरी मात्र बहुजनांची...’ आम्ही हे आता चालू देणार नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
---------
पुरोगामी कोल्हापूरने दखल घेतली
गायकवाड याच्या बाजूने ३१ वकिलांनी वकीलपत्र दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पुरोगामी कोल्हापूरने याची दखल स्वत:हून घेतली. पानसरे कुटुंबीयांच्या वतीने सुमारे ३०० वकिलांनी वकीलपत्र दाखल केले. त्याबद्दल स्मिता पानसरे, मेघा पानसरे, मल्हार पानसरे, कॉ. दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रवी गायकवाड, बन्सी सातपुते यांनी सर्व वकिलांचे आभार मानले.
-------
श्रद्धा पवारची चौकशी
समीरची मैत्रीण श्रद्धा पवारला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी पोलीस कोठडी मिळाल्यानंतर दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत समीरचीही चौकशी सुरू होती.
-------
(प्रतिनिधी)