Sameer Wankhede Transfer: वानखेडे पुन्हा डीआरआयमध्ये; नव्या अधिकाऱ्याकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 07:20 IST2022-01-04T07:20:00+5:302022-01-04T07:20:16+5:30
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अँगलनंतर सप्टेंंबर २०२० मध्ये समीर वानखेडे यांची एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून नियुक्ती झाली.

Sameer Wankhede Transfer: वानखेडे पुन्हा डीआरआयमध्ये; नव्या अधिकाऱ्याकडे सर्वांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी कारवाईनंतर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संचालक म्हणून ते आता काम पाहतील.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अँगलनंतर सप्टेंंबर २०२० मध्ये समीर वानखेडे यांची एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. वानखेडे यांना एनसीबीमध्ये दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यांचा ३१ डिसेंबर रोजी कार्यकाळ संपला होता. त्यामुळे त्यांची बदली होणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. वानखेडे मुंबईबाहेर असल्याने मंगळवारी नवीन पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागी कोण येणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कुख्यात दाऊद इब्राहिम याचे ड्रग्ज सिंडिकेटही त्यांनी उध्वस्त केले.
लढा सुरूच : मलिक
समीर वानखेडे यांची एनसीबीमधून केलेली बदली हा केंद्र सरकारने घेतलेला योग्य निर्णय आहे. मात्र, संपूर्ण प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
आर्यन प्रकरणामुळे वाद
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले. नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हे खंडणीचे प्रकरण असल्याचा आरोप केला होता.