एसीबीकडून समीर भुजबळ यांची पुन्हा चौकशी
By Admin | Updated: March 10, 2015 04:17 IST2015-03-10T04:17:51+5:302015-03-10T04:17:51+5:30
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांची चौकशी केली़

एसीबीकडून समीर भुजबळ यांची पुन्हा चौकशी
मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांची चौकशी केली़
समीर हे त्यांच्या वकिलासोबत चौकशीसाठी आले होते़ चौकशी दरम्यान त्यांनी तपासाच्या अनुषंगाने कसलीही विनंती केली नसल्याचे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
‘आप’च्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे़ दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामात भुजबळ कुटुंबीयांनी घोटाळा केला असून, याची चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे़ याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीसाठी सीबीआय व ईडीचे संयुक्त पथक स्थापन केले़ या आदेशाला भुजबळ कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले़ सर्वोच्च न्यायालयाने भुजबळ कुटुंबीयांची याचिका फेटाळली़ त्यानंतर उच्च न्यायालयात पुन्हा या प्रकरणी याचिका करण्यात आली़ संयुक्त पथक नेमण्याच्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी भुजबळ कुटुंबीयांनी याचिकेत केली़ मात्र तीही मागणी न्यायालयाने फेटाळली़ त्यामुळे एसीबीने भुजबळ कुटुंबीयांची चौकशी सुरू केली
आहे़ (प्रतिनिधी)