त्याच पिडीता पुन्हा पुन्हा.... सेक्स रेकेटचे दुष्टचक्र
By Admin | Updated: July 31, 2016 19:51 IST2016-07-31T19:51:11+5:302016-07-31T19:51:11+5:30
गोव्यात आॅनलाईन व आॅफ लाईन सेक्स रेकेट्स चालविणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई जोमात सुरू आहे. विशेषत: गुन्हा अन्वेषण विभागाकडून वारंवार छापे टाकण्यात आले आहेत

त्याच पिडीता पुन्हा पुन्हा.... सेक्स रेकेटचे दुष्टचक्र
वासुदेव पागी
पणजी, दि. ३१ : गोव्यात आॅनलाईन व आॅफ लाईन सेक्स रेकेट्स चालविणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई जोमात सुरू आहे. विशेषत: गुन्हा अन्वेषण विभागाकडून वारंवार छापे टाकण्यात आले आहेत. छाप्यातून ज्या युवतींची सुटका करण्यात आली वगैरे म्हटले जाते त्याच युवतींची यापूर्वीही सुटका करण्यात आली असल्याच्या नोंदी पोलीसांच्या डायरीतही मिळत आहेत आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या गोमेकॉतही त्यांच्या पूर्वी चाचणी घेतल्याच्या नोंदी मिळत आहेत.
राज्यात वेश्या व्यसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे वारंवार होणाऱ्या छाप्यावरूनही स्पष्ट होत आहे. या छाप्यातून दलालांना पकडले जाते तर वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या महिलांना ताब्यात घेतले जाते. त्या वेश्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी असल्या तरी कायद्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यांना दलालांकडून फसवून किंवा प्रलोभने दाखवून आणले जात असल्यामुळे त्यांना पीडितांच्या यादीत गणले जाते. हा कायदा महिलांच्या भल्यासाठीच करण्यात आला होता. त्यांना जीवनाची नवीन सुरूवात करण्याची संधी मिळावी किंवा पुनर्वसन व्हावे हा त्यामागे हेतू होता, परंतु एखादी सुटका करण्यात आलेल्या महिलेची कालांतराने पुन्हा पुन्हा सुटका करावी लागते त्यावेळी त्यांची सुटका करणारे पोलीसही अचंब्यात पडत आहेत.
गोमेकॉतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ज्या महिलांची वेश्या दलालांच्या तावडीतून सुटका केली म्हणून गोमेकॉत वैद्यकीय चाचणीसाठी आणले गेले त्यापैकी अनेक महिला या पहिल्या वेळी आलेल्या नसतात. पाच सहा वर्षांत एक पेक्षा अधिकवेळा त्यांच्यापैकी बहुतेकांच्या वैद्यकीय चाचण्या केलेल्या असतात. गोमेकॉतील एका अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आली. गोव्यात गोमेकॉत त्यांच्या एक पेक्षा अधिकवेळा नोंदी सापडत असतील तर इतर राज्यातील इस्पितळातही तशा नोंदी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही महिलांची पोलिसांच्या फायलीतही नोंद असल्याचे आढळून आले आहे. सुटका करण्यात आलेल्या महिला प्रत्येकवेळी आपली नावे बदलत असल्याचेही आढळून आले आहे. ही सर्व माहिती असूनही पोलिसांना अशा महिलांच्या बाबतीत पिढीत म्हणूनच व्यवहार करावा लागतो अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कायद्याचा सर्रासपणे दुरुपयोग केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
केवळ पीडीत महिलाच नव्हे तर ज्या दलालांना अटक केली जात आहे त्याच दलालांना कधी कधी दुसऱ्यांदा अटक करण्यात आल्याचेही पोलिसांच्या नजरेस आलेले आहे. अशा दलालांनी दुसऱ्यावेळी दुसरेच नाव सांगितलेले असते. त्यांच्याकडे ओळखपत्रेही ते जवळ बाळगत नाहीत.