Grampanchayat Election 2022: धुरळा! संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा; ग्रामपंचायतीत जिंकली पहिली जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:32 IST2022-09-19T17:31:18+5:302022-09-19T17:32:31+5:30
Grampanchayat Election 2022: रुपाली ठमकेंनी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळवून दिला आहे.

Grampanchayat Election 2022: धुरळा! संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा; ग्रामपंचायतीत जिंकली पहिली जागा
Maharashtra Politics: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. (Grampanchayat Election 2022) ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने तिसरे स्थान पटकावले आहेत. तर शिंदे गटाने चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. या निकालांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे चित्र असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मात्र, यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेने (Swarajya Sanghatna) विजयाचा श्रीगणेशा केला असून, एक उमेदवार विजयी झाला आहे.
महाराष्ट्रातून पहिला विजय हा स्वराज्य संघटनेला नाशिकच्या गणेश गावातून मिळाला आहे. स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा हा नाशिक जिल्ह्यातील गणेश गावातील एका महिलेच्या रूपाने मिळाला असून रूपाली ठमके असे विजयी उमेदवाराचे नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते.
स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी
स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आले होते. त्यापैकी गणेशगाव येथे सरपंच पदासाठी रूपाली ठमके यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा तिथे विजय झाला आहे. याशिवाय राजेवाडी, गंगावरे-सावरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी फोनद्वारे रूपाली यांचे अभिनंदन केले आहे. रूपाली ठमके यांच्या रूपाने स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.