Sambhajiraje Chhatrapati: मोठी घडामोड! कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाला 'मातोश्री'चं बोलावणं, संभाजीराजेंचं ठरेना, शिवसेना मागे हटेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 13:19 IST2022-05-24T13:18:17+5:302022-05-24T13:19:36+5:30
Sambhajiraje Chhatrapati on the Way of Mumbai: छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शिवबंधन बांधण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू संभाजीराजे पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले होते. आज सकाळी पुन्हा संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Sambhajiraje Chhatrapati: मोठी घडामोड! कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाला 'मातोश्री'चं बोलावणं, संभाजीराजेंचं ठरेना, शिवसेना मागे हटेना!
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाराष्ट्रात राजकीय वादळ आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शिवबंधन बांधण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू संभाजीराजे पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले होते. आज सकाळी पुन्हा संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले आहेत. निघण्यापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याच घडामोडींवर एक मोठी बातमी आली आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांना मातोश्रीवर येण्याचे आदेश दिले आहेत. संभाजीराजे मुंबईला निघण्याआधीच जिल्हा प्रमुख संजय पवार यांना मातोश्रीवरून फोन आला, त्यांना तातडीने मुंबईकडे निघा, असे आदेश देण्यात आले आहेत.
संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. गेली तीस वर्षे ते सीमालढ्यात सक्रीय आहेत. दोनदा नगरसेवकही राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला ही जागा सोडली होती. यामध्ये शिवसेनेने काँग्रेसला मदत केली होती. संभाजीराजेंकडून काहीच सिग्नल येत नसल्याने शिवसेनेने सहाव्या उमेदवाराची तयारी सुरु केली आहे. संजय पवार हे मातोश्रीच्या खूप जवळचे आहेत. कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांची जबाबदारी संजय पवारांकडे आहे. यामुळे त्यांना मातोश्रीवरून निरोप येणे खूप महत्वाचे मानले जात आहे.
संभाजीराजे काय म्हणाले...
संभाजीराजे यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. संभाजीराजे आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील अशी अपेक्षा असल्याचं, मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झालीय. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, असं संभाजीराजे यांनी म्हटले आहे.